Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

मानसिक ताणांचा, उदासीनतेच्या कारणांचा उलगडा दासबोधात – समीर लिमये

Advertisements

रत्नागिरी : माणसाला येणाऱ्या ताणांच्या, उदासीनतेच्या आणि नैराश्याच्या कारणांचा उलगडा दासबोधात आहे. दासबोधाचे विचारपूर्वक वाचन केले, तर यशस्वी नक्की होता येईल, असे प्रतिपादन दासबोधाचे अभ्यासक आणि कीर्तनकार समीर लिमये यांनी केले.

रत्नागिरीत कॉर्पोरेट कीर्तन सादर करताना समीर लिमये

दोन दिवस चाललेल्या केबीबीएफ ग्लोबल मीटच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या कॉर्पोरेट कीर्तनात निरूपण करताना ते बोलत होते. या मीटचा समारोप आज रत्नागिरीत झाला. कनेक्ट टू रिज्युविनेट या संकल्पनेवर आधारित ही मीट दोन दिवस चालली. या मीटमध्ये दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात बोलताना श्री. लिमये म्हणाले, समर्थ रामदास स्वामी म्हणजे व्यवस्थापनशास्त्राचे तज्ज्ञ होते. लोकांना सहज समजेल, अशा भाषेत त्यांनी दासबोध, मनाचे श्लोक अशा रचनांमध्ये यशस्वी जीवनाचे सार सांगितले आहे. सिग्मंड फ्रॉइड वा़चला का, असे सहज विचारले जाते. फ्रॉइड अवश्य वाचावा. पण त्याचबरोबर मनाचे श्लोक वाचावेत. तुलनात्मक अभ्यास करावा. व्यवसाय करताना मनावर ताण येतो, नैराश्य येते, उदासीनता येते. तिचे मूळ कारण मनात आहे, हेच मनाच्या श्लोकात सांगितले आहे. समोरच्याचे ऐकून घेणेही आवश्यक आहे. मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंद ते साधनायोग्य होती, असे समर्थांनी म्हटले आहे. केवळ ऐकणे या विषयावर दासबोधात तीन समास आहेत. एवढे श्रवणाला महत्त्व आहे. श्रवण, मनन, निजध्यास आणि साक्षात्कार या चार अवस्था त्यांनी सांगितल्या आहेत. पण साक्षात्कार शब्द आला की काहीतरी चमत्कार आहे, असे वाटते. पण चांगले ऐकावे, मनन करावे, त्यानंतर त्याची सातत्याने आणि विवेकाने अंमलबजावणी करावी. असे केले, तर यश नक्कीच मिळेल. सदैव ऐकायला तयार राहिले पाहिजे. समर्थांनी विवेक हा शब्द २५६ वेळा वापरला आहे. त्याचा अर्थ ऐकून त्यावर सारासार विचार करावा, असा आहे. भय, भ्रम आणि संशय या त्रिकुटावर यश अवलंबून असते. व्यावसायिकांच्या बाबतीत सांगायचे झाले, तर मी मिळविले आहे, ते पुढे टिकेल की नाही, याचे सतत भय वाटत असते. पण मीच सारे मिळवले, हा भ्रम असतो. तो दूर झाला पाहिजे. आपण काम करत राहावे. त्याचे परिणाम आपोआप मिळणार आहेत, असे समर्थ म्हणतात. दासबोधातील सात हजार ७५१ ओव्यांमध्ये समर्थांनी ठिकठिकाणी हे सांगितले आहे, असेही श्री. लिमये यांनी सांगितले.

कॉर्पोरेट कीर्तनानंतर स्पीक आउट या कार्यक्रमात ठाणे, डोंबिवली, पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायातील यशापयश विशद केले. अडचणींवर कशी मात केली, तसेच भविष्यातील योजनांची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रशांत पाध्ये यांनी केले.

दरम्यान, मीटच्या पहिल्या दिवशी सायंकाळी केबीबीएफ ग्लोबलचे अध्यक्ष अमित शहाणे यांनी कोकणातील उत्पादनांवर आधारित सहकारी संस्था, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी केबीबीएफतर्फे सुरू करण्याची कल्पना मांडली. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी स्वतः फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केल्यानंतरचे अनुभव सांगितले. शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना उत्पादन घेऊ द्यावे आणि त्यातून तयार झालेला शेतमाल प्रक्रियेसाठी वापरून प्रक्रिया उद्योग चालविला, तर तो यशस्वी होईल. शेतकऱ्यांनाही त्यांच्या श्रमाचे फळ मिळेल, असेही ते म्हणाले.

दोन दिवसांच्या ग्लोबल मीटचा आज समारोप झाला. मीटचे प्रायोजक कौस्तुभ कळके (जोशी बिल्डर्स अँड रिडेव्हलपर्स), रवींद्र प्रभुदेसाई (पितांबरी उद्योग समूह), डॉ. श्रीधर ठाकूर (इन्फिगो आय केअर हॉस्पिटल), सदानंद ठाकूर (ठाकूर फायनान्स) आणि अभय खेर (कैरी विश्रांती) यांच्यासह मीटसाठी सहकार्य़ करणाऱ्या सर्वांविषयी सौ. सई ठाकूरदेसाई यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यापुढील ग्लोबल मीट सिंधुदुर्ग जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती केबीबीएफ ग्लोबलचे उपाध्यक्ष प्रदीप जोशी यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version