रत्नागिरी : केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांचा मेळावा येत्या १४ आणि १५ जानेवारीला रत्नागिरीत होणार आहे. कनेक्ट टू रिज्यूविनेट अशी या ग्लोबल मीटची संकल्पना आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील व्यवसाय, उद्योग तसेच व्यापार करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या बांधवांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये वैचारिक तसेच व्यावसायिक देवाणघेवाण करणे आणि त्यातून ज्ञातिबांधवांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देणे या उद्देशाने कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन ही संस्था काम करते. रत्नागिरीत या संस्थेचे कार्य गेली पाच वर्षे सुरू आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक ज्ञातिबांधवांच्या व्यवसाय-उद्योगाला चालना मिळावी, यासाठी त्यांचा व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे विविध उपक्रम, त्यातून होणारे व्यावसायिक लाभ याची माहितीही यावेळी मिळेल. नेहमीचा व्यवसाय करताना व्यावसायिकांनी इतर व्यवसायांकडेही वळावे, या दृष्टिकोनातून कनेक्ट टू रिज्युविनेट या संकल्पनेवर या वर्षीचा मेळावा आधारलेला आहे. नवे विचार, वेगवेगळ्या संकल्पना, नव्या कल्पना आणि आपल्या व्यवसायाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. पहिल्या दिवशी, १४ जानेवारीला सायंकाळी ४ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे. दासबोधातून प्रकट होणाऱ्या व्यवस्थापनाच्या सूत्रांची हसत खेळत ओळख करून देणारे समीर लिमये यांचे कॉर्पोरेट कीर्तन हे या मेळाव्याचे खास आकर्षण आहे.
पर्यटन, आयटी क्षेत्र, घरगुती उद्योगांपासून मोठ्या हॉटेलपर्यंत कोणताही व्यवसाय करणाऱ्या कऱ्हाडे ज्ञातिबांधवांना या ग्लोबल मीटमध्ये सहभागी होता येईल. संपूर्ण महाराष्ट्रामधील कऱ्हाडे व्यावसायिक ज्ञातिबांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे. मीटसाठी येऊ इच्छिणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी येत्या १० जानेवारीपूर्वी ऑनलाइन नोंदणीसाठी उमेश आंबर्डेकर (९८५००८२४३७), अमोल पंडित (९४२२०५२४६१) किंवा विनय टोळ्ये (८६०५९४८३२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media

