कीर्तनसंध्या महोत्सवाचा तिसरा दिवस
रत्नागिरी : उत्तम संस्कार घडविणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी झाली आहे, अशी खंत राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी व्यक्त केली.
रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात तिसऱ्या दिवशी कीर्तन करताना ते निरूपण करत होते. त्यांनी काय वानू आता संतांचे उपकार हा अभंग घेऊन त्यावर गुरूचे महत्त्व विशद करणारे निरूपण केले. गुरूंची भूमिका कशी, किती आणि केवढी असावी, याविषयी त्यांनी विविध उदाहरणे दिली. गुरू सातत्याने शिष्याला जागवत असतो, असे सांगून त्यांनी उत्तम गुरूंची रामायणकाळापासूनची काही उदाहरणे दिली. अलीकडच्या चाळीस वर्षांमध्ये शिक्षकांच्या वृत्तीमध्ये बदल झाल्याचे सांगून ते म्हणाले की, चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत कोणताच शिक्षक अशुद्ध बोलत नव्हता. कोणत्याही जातीप्रजातीमधील व्याख्याताही चुकीचे बोलत नव्हता. योग्य बोलणे म्हणजे संस्कारक्षम असणे होय. पण आता प्रकटपणे चुका केल्या जातात आणि त्याचे समर्थनही केले जाते. अपूर्णतेचा अभिमान असलेले शिक्षक घडविले गेले आहेत. त्यामुळे पुढच्या पिढीवर योग्य संस्कार होत नाहीत, असे बुवांनी सांगितले. पूर्वीचे गुरू एकमेकांशी किती एकरूप होते, हे पटवून देण्यासाठी त्यांनी वशिष्ठ आणि विश्वामित्र या दोन ऋषींचे उदाहरण दिले.
कीर्तनाच्या उत्तररंगात आफळेबुवांनी चितोड, मारवाड, राजस्थान, गुजरात आणि दिल्लीत झालेल्या साम्राज्य क्रांतीचा आढावा घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या सहा सोनेरी पाने या ग्रंथात कमलदेवी, देवलदेवी आणि खुश्रू खान यांनी केलेल्या पराक्रमासाठी एक प्रकरण लिहिले आङे. सन एक हजार सालानंतर तेराशे सालापर्यंत दिल्लीत हिंदूंची सत्ता नव्हती, पण १३२० मध्ये एक वर्षासाठी का होईना, पण हिंदू राज्य निर्माण करण्यात यश आले. त्यानंतर चितोडचा हमीर राणा, लक्ष्मण सिंह, खिलजीनंतर दिल्लीत आलेल्या तघलकांचा पराभव करणाऱ्या राजस्थानच्या भूमितील राणा कुंभा, राणा सांगा यांनी केलेल्या पराक्रमाचे वर्णन बुवांनी केले. वेड्या तघलकाने चितोडवर स्वारी करून चितोड जिंकले. हमीर पराभूत झाला, पण तघलकाने तेथे अधिकारावर बसवलेल्या मालदेवाच्या कन्येशीच सोयरीक करून हमीर राणाने चित्तोडची सत्ता पुन्हा कशी मिळविली, याचे खुमासदार वर्णन बुवांनी केले. उत्तरेतील अनेक यवनांचा पराभव भारतीय राजांनी केला, मात्र भरपाई म्हणून काही लाख सुवर्णमुद्रांच्या बदल्यात त्यांना तुरुंगातून सोडण्याचे काम त्यांनी केले. त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही राणा कुंभाने चाळीस वर्षे चित्तोडची सत्ता सांभाळली. राणा संग्राम सिंह ऊर्फ सांगा, चितोडच्या संत मीराबाई यांच्याविषयीही बुवांनी वर्णन केले.
कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सीतेच्या विवाहाला काय म्हणतात, असा प्रश्न विचारण्यात आला होता. वीर्यशुल्का असे त्या प्रश्नाचे बिनचूक उत्तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे आशीष आठवले यांनी दिले. त्यांचा सन्मान करण्यात आला.
बुवांना या कीर्तनासाठी प्रथमेश तारळकर (पखवाज), वरद सोहोनी (ऑर्गन), उदय गोखले (व्हायोलिन), हेरंब जोगळेकर (तबला) आणि कीर्तनकार नरहर बुवा करंबेळकर (तालवाद्य) यांनी साथ केली.
प्रश्नमंजूषा
मध्यंतरात प्रश्नमंजूषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. दिलेल्या शब्दासाठी मृत्यूलाही सामोरे जाणारे राजे कोण, असा प्रश्न पहिल्या दिवशीच्या कीर्तनावर आधारित विचारण्यात आला होता. राजा हरिश्चंद्र, राजा दशरथ आणि शिबी राजा अशी योग्य उत्तरे पूर्वा चौगुले, सिद्धी अभिजित कोळेकर आणि देवांशी आशीष चौगुले यांनी दिली. त्यांना बुवांच्या हस्ते श्रीशिवछत्रपती समर्थ योग ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.


