तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे : उदय सामंत

रत्नागिरी : येथे आज झालेल्या महारोजगार मेळाव्यात सात हजार ८०० तरुणांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यात निवड होणाऱ्या तरुणांना लागलीच नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत. मात्र तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक व्हावे, अशी अपेक्षा उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

श्री. सामंत यांच्या हस्ते आज येथील रा. भा. शिर्के प्रशालेमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्जमंजुरी पत्र वाटप करताना श्री. सामंत यांनी उपस्थित तरुण-तरुणींना आवाहन केले की, तरुणांनी स्वतःचे उद्योग उभारावेत. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील महिलांनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नर्सरीचे त्यांनी यावेळी उदाहरण दिले. या महिलांसारखेच कोकणातील महिलांनी-युवतींनीही नावीन्यपूर्ण उद्योग करण्यासाठी पुढे यावे, सरकार आपल्या पाठीशी आहे.

श्री. सामंत म्हणाले की, जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी भविष्याचा विचार करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका तरुणांनी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले. माझ्याकडे उद्योग खाते असल्याने त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली. या रोजगार मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन सात हजार ८०० अर्जांबरोबरच ऑफलाइन अर्जही मोठ्या प्रमाणावर आले आहेत. राज्यातील, राज्याबाहेरील, आंतरराष्ट्रीय अशा १३० कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत.

श्री. सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीच्या समुद्रकिनारी पोलाद उद्याग उभारून येथील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची इच्छा विश्वविख्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी एका भेटीत व्यक्त केली आहे, तर इलेक्ट्रॉनिक मोटर्स हब रत्नागिरीत उभारण्याची इच्छा सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केली. मात्र येथील जनतेने मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी कोकणात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका तरुणांनी घेतली पाहिजे. कोकणातील जनता संयमी आहे. या मुलांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती सिद्ध करून दाखवतात, हे रत्नागिरी जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी असणे गरजेचे आहे. याबाबत कोकणातील जनतेने मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळायला हवा, काम मिळावे म्हणून हे शिंदे-फडणवीसांचे सरकार प्रामाणिकप्रमाणे काम करीत आहे.

अशा प्रकारचे मेळावे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहेत. येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तरुण-तरुणींसाठी ऐतिहासिक नोकरी मेळावा सीमा भागात घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.

आजच्या रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून ज्या युवक-युवतींची नोकरीसाठी अंतिम निवड झालेली आहे, त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ज्या बँकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्या बॅंकांच्या व्यवस्थापकांचाही सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जीएस हरळय्या, पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उद्धव माने, बँक प्रतिनिधी, अण्णा सामंत, युवा हबचे संचालक किरण रहाणे, राहुल पंडित, शशिकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी, तर प्रास्ताविक कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक सतीश भामरे यांनी केले. रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply