साहित्यातील दीपस्तंभ… एक अमृतानुभव!

कितीतरी अनुभवांच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या राशी दवणे सर आमच्यासमोर ओतत होते आणि आम्ही अल्प बुद्धी जमेल तेवढं हृदयात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.

……………………..

दोन दिवस व्यावसायिक कामासाठी देवगडला गेलो होतो. एक मार्चला सकाळी परतण्याचं नियोजन असताना प्रत्यक्षात कालच, २८ तारखेलाच काम आटपतंय असं वाटल्याने दुपारनंतर देवगड सोडण्याचा निर्णय झाला… तरी निघे-निघेपर्यंत ४ वाजून गेलेच… आणि गाडी जेव्हा रत्नागिरीच्या दिशेने धावू लागली, तेव्हा चतुरंगच्या रत्नागिरीतल्या कार्यक्रमाच्या प्रेमळ निमंत्रणाची आठवण झाली. आडिवरे मागे पडलं, तेव्हा खात्री झाली की आपण वेळेत कार्यक्रमाला पोहोचू शकतो.
बरोब्बर ६.२७ वाजता रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात पोहोचलो… मुक्तसंध्या अंतर्गत प्रा. प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होता आणि त्यांचा विषय होता “साहित्यातील दीपस्तंभ ” …

गेल्या गेल्या चतुरंगच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रेमाने स्वागत केलं. पुढे येऊन बसण्याची विनंती केली, पण त्यांना नम्रपणे नकार देऊन शेवटच्या रांगेतच बसलो. कारण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर मी माझ्या सहकाऱ्याला आधीच सांगितलं होतं, अर्धा तास व्याख्यान ऐकू आणि निघू. कारण दोन दिवस देवगडला कामाचा ताण, त्यात देवगड ते रत्नागिरी ड्रायव्हिंग झालेलं. त्यामुळे थोडा थकवा जाणवत होता.

संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी प्रा. दवणे सभागृहात आले. काहीच क्षणात त्यांनी मंचाचा ताबा घेतला आणि त्यानंतर अजून काही क्षणात उपस्थित रसिकांच्या मनाचाही! दवणे सर बोललेल्या दीड तासात आपल्यासमोर व्याख्यान सुरू आहे असं कुठेही जाणवलं नाही. साहित्यातील त्यांना भेटलेले आणि भावलेले अनेक दीपस्तंभ आमच्यासमोर गप्पांच्या स्वरूपात उलगडले जात होते, जणू काही आत्ताच त्यांना भेटून आलो आणि मग काय झालं ते ऐका, इतक्या त्या सहज गप्पा होत्या….

दवणे सरांच्या सुदैवाने मराठी आणि हिंदी साहित्यातील अनेक दीपस्तंभांचा त्यांना प्रत्यक्ष सहवास लाभला आणि रत्नागिरीतल्या उण्यापुऱ्या दीडशे लोकांचं भाग्य असं की प्रत्यक्ष दवणे सरांच्या तोंडून त्यांना ते अनुभवता आलं. आता अख्ख्या रत्नागिरीत आमच्यासारखे दीडशेच सुदैवी का निघाले, हा स्वतंत्र विषय आहे. पण दवणे सर बोलत होते, आम्ही जीवाचे कान करून ऐकत होतो. ( ध्वनिव्यवस्था थोडी सदोष असल्यामुळे शब्दशःसुद्धा कान देऊनच ऐकावं लागत होतं. पण या साऱ्या दुय्यम गोष्टी होत्या, कारण साक्षात दवणे सर बोलत होते.)

आता घड्याळाच्या वेळाने आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टींनी, एकमेकांवर मात केली होती. अर्ध्या तासात निघायचं, असं ठरवून बसलेले आम्ही दीड तासानंतर जेव्हा दवणे सर थांबले, तेव्हा भानावर आलो. पण त्या दीड तासात सरांनी आम्हाला पुलंपासून कुसुमाग्रजांपर्यंत आणि अटलजींपासून अमृता प्रीतम यांच्यापर्यंत अनेकांना भेटवून आणलं होत.

प्रवीणमधला ‘वी’ दीर्घ काढायचा, अशी शिकवणी घेण्यापासूनचे संस्कार असतील, कुसुमाग्रजांनी मनातलं ओळखून पाठीवर हात ठेवून ‘उद्या सकाळी १० वाजता या’, असं दिलेलं निमंत्रण असेल, अटलजींसोबत ते पंतप्रधान असताना केवळ ‘महाराष्ट्र से एक कवी आया है’ या एका निरोपावर न ठरवता झालेली भेट असेल, अमृता प्रीतम यांच्या कार्यक्रमाला पहिल्या रांगेत बसून, अमृता प्रीतम यांनी कैफी आझमी यांना साहीरचे मित्र म्हणून दिलेलं आलिंगन अनुभवण असेल, लतादीदींनी कवी नरेंद्र शर्मा यांच्याकडून अर्धा-पाऊण तास गीत समजावून घेणं असेल, अशा कितीतरी अनुभवांच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या राशी दवणे सर आमच्यासमोर ओतत होते आणि आम्ही अल्प बुद्धी जमेल तेवढं हृदयात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. अर्थात ते तरी सगळं कुठलं जमायला? तेवढी आमची पात्रताही नाही. पण तरीही थोडेसे कण वेचता आले हे आमचं भाग्य!

एवढा सुंदर सुयोग जुळवून आणल्याबद्दल चतुरंगचे खूप मनापासून आभार. चतुरंगच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आणि आम्हा साऱ्यांना एका वेगळ्या अमृताची चव चाखू दिली. दवणे सरांच्या व्याख्यानाबद्दल लिहिण्याची खरं तर माझी योग्यता नाही, पण जो अमृतानुभव घेतला तो तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावा, म्हणून हे धाडस करण्याचा प्रयत्न केला, इतकंच….
धन्यवाद चतुरंग आणि खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार प्रा. दवणे सर….

  • निबंध कानिटकर, संगमेश्वर
    (संपर्क : ९४२२३७६३२७)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply