स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे सीआरएआर प्रमाण किमान टक्केवारीच्या तिप्पट

अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे नव्याने लागू केलेले सीआरएआरचे प्रमाण (भांडवलाचे मालमत्तेशी पर्याप्तता प्रमाण) किमान टक्केवारीच्या तिप्पट आहे. आर्थिकदृष्ट्या पतसंस्था अत्यंत बलवान असल्याचेच हे द्योतक आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

ज्या दिवशी आर्थिक वर्ष संपते, त्याच म्हणजे ३१ मार्च याच दिवशी स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आपला वर्षभराची आर्थिक माहिती जाहीर करते. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षाची माहिती आज श्री. पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पतसंस्थांच्या भांडवलाचे मालमत्तेशी पर्याप्तता प्रमाण ही नवी संकल्पना यावर्षीपासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार ती किमान ९ टक्के राखणे पतसंस्थांसाठी आवश्यक झाले. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची ही टक्केवारी तब्बल २७ टक्के म्हणजे किमान टक्केवारीच्या तिप्पट आहे. देणी भागवण्यासाठी संस्थेकडे पर्याप्त भांडवल क्षमता आहे. याचा अर्थ संस्था आर्थिकदृष्ट्या बलवान आहे, असे त्यांनी सांगितले.

पतसंस्थेच्या आर्थिक उलाढालीची माहिती देताना ते म्हणाले, विक्रमी वसुलीसह सातत्यपूर्ण, वर्धिष्णु अर्थकारण करणारी पतसंस्था ही बिरुदावली दिमाखात मिरवता येईल, अशी पतसंस्थेची गेल्या आर्थिक वर्षाची प्रगती आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या आर्थिक वर्षात विक्रमी वसुलीचा पायंडा कर्जदारांच्या सहकार्याने कायम राखत ९९.६१ टक्के वसुली झाली आहे. संस्थेच्या १० शाखांची वसुली १०० टक्के झाली असून एकूण २२ हजार ५५६ कर्जदारांपैकी केवळ ४० कर्जदार थकीत राहिले आहेत. संस्थेचा नेट एनपीए शून्य टक्के ठेवण्यात संस्थेला यश मिळाले. यावर्षी झालेल्या उत्तम वसुलीमुळे संशियत कर्जापोटी नव्याने तरतूद करावी लागली नाही. आर्थिक वर्षात संस्थेचे येणे कर्ज १८२ कोटी रुपये असून गतवर्षीपेक्षा १२ कोटींची वाढ एकूण कर्ज व्यवहारात झाली. ठेवींमध्येही १५ कोटींची वाढ झाली असून वर्षअखेरीला २६५ कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेकडे ७६ हजार ५२७ ठेवीखात्यांचे माध्यमातून जमा आहेत. गुंतवणूक १३१ कोटी रुपयांची असून संस्थेचा स्वनिधी ३७ कोटी इतका झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला ६ कोटी ६१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून गतवर्षीपेक्षा यावर्षी ४० लाखांनी नफा वाढला आहे.

सन २०२१-२२ च्या पूर्वार्धात बँक ठेव व्याजदर कमी झाल्याने १ कोटी ५० लाखांचे उत्पन्न कमी झाले, तरीही सुरुवातीपासून योग्य नियोजन करत ठेवी उभारणी दर आणि कर्ज व्याजदर यात प्रमाणबद्ध बदल करत सोनेतारण कर्जाचे प्रमाण वाढवत वर्षअखेरीला ६ कोटी ६१ लाख निव्वळ नफा मिळविण्यात संस्थेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

या वर्षअखेर पतसंस्थेची सभासद संख्या ४२ हजार २५० झाली असून संस्थेच्या १७ शाखांच्या माध्यमातून हा अर्थव्यवहार होत आहे. सर्व शाखांनी उत्तम नफा आणि व्यवसाय वृद्धी केली आहे. नवीन आर्थिक वर्षात ५ नव्या शाखा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ३०० कोटींचा ठेवटप्पा पार करताना २०० कोटींचा कर्जटप्पा पार करत संस्थेचा संमिश्र व्यवसाय ५०० कोटी पार करण्यासाठी नव्या आर्थिक वर्षात प्रयत्न केले जातील. कर्जमर्यादेत वाढ करणए, क्यूआर कोड सुविधेसह अन्य डिजिटल बँकिंग सुविधा मर्यादित स्वरूपात सुरू करणे असे प्रयत्न आहेत. पावस आणि चिपळूण येथे संस्थेच्या स्वमालकीचे कार्यालयाचे स्वप्न या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पूर्ण होईल, असेही श्री. पटवर्धन म्हणाले.

ठेवीदार, कर्जदार, पिग्मीदार, सभासद, कर्मचारी, अधिकारी, पिग्मी प्रतिनिधी, संचालक, सहकारी, ऑडिटर, वकील, सहकार खात्याचे सर्व अधिकारी या सर्वांच्या सहकार्यामुळे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थचक्र गतिमान राहिल्याचे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply