चिपळूणच्या वस्तुसंग्रहालयात शिवरायांच्या दळवटणे सैन्यतळाची प्रतिकृती

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात शिवरायांच्या दळवटणे येथील सैन्यतळाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिकृती साकारण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला आहे. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे चिपळूणशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. आपल्या राज्याभिषेकापूर्वी महाराज चिपळूणजवळच्या दळवटणे गावी एक महिनाभर मुक्कामाला होते. दळवटणे येथे महाराजांचा सैन्यतळ होता. तेथेच महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना सरसेनापतिपदाची वस्त्रे बहाल केली होती. याच दळवटणे सैन्यतळाला उद्देशून, ९ मे १६७४ रोजी छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी दिलेले पत्र आदर्श राज्य कसे असावे, याचे उत्तम उदाहरण असून ते जगभरात भाषांतरित करून दर्शनी ठिकाणी लावले जायला हवे, अशी वाचनालयाची भूमिका आहे. त्याच दृष्टिकोनातून वस्तुसंग्रहालयात दळवटणे सैन्यतळ साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच समारंभात छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ येत्या मंगळवारी (दि. ११ एप्रिल) ब्राह्मण साहाय्यक संघाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशातील सौ. प्रतिभा सुरेश धुमाळ यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. समारंभात चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते तंजावरचे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचा सत्कार केला जाणार आहे. समारंभाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे भूषविणार आहेत. प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

श्रीछत्रपतींच्या वंशजांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह विनायक ओक, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply