पुणे : येथील विश्व मराठी परिषदेतर्फे ऑनलाइन लेखक-प्रकाशक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
लेखकांना, कवींना स्वतःच स्वतःची पुस्तके प्रकाशित करण्याच्या दृष्टीने कमीत कमी पैसे खर्च करून यशस्वी लेखक म्हणून प्रस्थापित होण्याकरिता या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुस्तक छपाई आणि प्रकाशन प्रक्रिया समजून घेता येईल. आपले पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही प्रकाशित करता येईल. स्वतःच स्वतःच्या पुस्तकांचे, कविता संग्रहांचे प्रकाशन करणे ही या कार्यशाळेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
आज तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. पूर्वी पुस्तक, ग्रंथ प्रकाशित करणे ही फार किचकट प्रक्रिया होती. लेखकाला प्रकाशक मिळणे हेच फार अवघड होते. प्रकाशकाने होकार देऊनही प्रत्यक्ष पुस्तक छापून प्रकाशित होणे ही वेळखाऊ प्रक्रिया होती. लेखकाने स्क्रिप्ट प्रकाशकाला दिल्यावर त्याचे टायपिंग, डीटीपी करणे, मुद्रितशोधन, संपादन आणि त्यानंतर छपाई अशी प्रक्रिया होती. मुखपृष्ठ तयार करण्याचेही काम करावे लागत असे. प्रस्तावना, अभिप्राय, आयएसबीएन क्रमांक घेणे, वर्तमानपत्रांमध्ये परीक्षण पाठवणे हे करावे लागत असे. आज तंत्रज्ञान सोपे झाले आहे. डीटीपी करणारे, मुद्रितशोधक, संपादक, मुखपृष्ठ बनवणारे चित्रकार स्वतंत्रपणे उपलब्ध झाले आहेत. आयएसबीएन क्रमांक लेखकाला ऑनलाइन मिळवता येतो. लेखक स्वतः प्रस्तावना मिळवू शकतो. स्वतः थेट वर्तमानपत्रांना परीक्षण पाठवू शकतो. त्यामुळे पुस्तकनिर्मिती प्रक्रियेतील वेळ खूप कमी झाला आहे. लेखक स्वतःच रेडी टू प्रिंट असे पुस्तक बनू शकतो. त्यासाठी त्याला काही रक्कम खर्च करावी लागते. मात्र ती फार जास्त नसते. तसेच प्रिंट ऑन डिमांड तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही पुस्तकाच्या पंचवीस ते पन्नास प्रतीही छापता येतात. त्यामुळे पुस्तकामध्ये फार मोठी रक्कम गुंतवून ठेवावी लागत नाही. बहुतेक लहान-मोठे प्रकाशक आता प्रिंट ऑन डिमांड पद्धतीचा वापर करीत आहेत. तसेच ऑनलाइन पुस्तक वितरणाच्या विविध सुविधा आणि अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारखी पोर्टल निर्माण झाल्याने वितरण करणे सोपे झाले आहे. तसेच ऑनलाइन बँकिंगमुळे पुस्तकाची रक्कम थेट लेखकाच्या खात्यात जमा होऊ शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून पुस्तकाची प्रसिद्धी करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे वाचक थेट ऑनलाइन पुस्तक मागवू शकतात.
याविषयीची समग्र माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. कार्यशाळेत सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते, करियर मार्गदर्शक विवेक वेलणकर आणि लेखक, प्रकाशक, उद्योजक, भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले मार्गदर्शन करणार आहेत. येत्या ११ ते १४ एप्रिल या काळात दररोज सायंकाळी ८ ते ९ या वेळेत कार्यशाळा होईल. मोबाइलवर झूमद्वारे ही ऑनलाइन कार्यशाळा होईल. कार्यशाळेचे सहभाग शुल्क ७५० रुपये आहे. विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात २० टक्के सवलत दिली जाणार आहे.
कार्यशाळेत मोबाइलवर झूम अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन नावनोंदणीसाठी लिंक –
https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/publication


