केंद्रीय रस्ते वाहतूक आणि मंत्री नितीन गडकरी यांचा नुकताच कोकणाचा दौरा झाला. काही भागात त्यांनी प्रत्यक्ष महामार्गावरून फेरफटका मारला, तर काही भागात हवाई पाहणी केली. आपल्या दौऱ्यात त्यांनी महामार्गाशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. योग्य त्या सूचना केल्या. अनेकांशी संवाद साधला. महामार्गाची पाहणी हवाई मार्गाने करणे कितपत योग्य आहे, असा टीकेचा सूरही काहींनी लावला, पण अशी टीका केवळ टीकेसाठी केली जात असते. त्यातून घेण्यासारखे काहीही नसते. श्री. गडकरी यांनी दौरा केला आणि त्यानंतर त्यांनी ज्या सूचना केल्या, त्या अमलात आणण्यासाठी आपण काही करू शकतो का, याचा विचार झाला पाहिजे.
श्री. गडकरी यांनी ज्या अनेक सूचना केल्या त्यापैकी सर्वांत महत्त्वाची सूचना होती ती महामार्गाच्या मधोमध आणि बाजूला वनीकरण करण्याची. महामार्गाची रुजवात जेव्हा झाली तेव्हाच याबाबत बरेच चर्वितचर्वण झाले होते. हा हरित महामार्ग होणार असल्याचे तेव्हा जाहीर झाले होते. त्या नावाखाली लक्षावधी झाडांची कत्तल या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी करण्यात आली. तेव्हा टीकेची झोड उठवली गेली होती, पण त्या सर्व टीकांवर मात करून महामार्ग आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता तरी निदान हा महामार्ग हरित महामार्ग होण्याच्या दृष्टीने काही होणार आहे का, याचा सत्तारूढ तसेच विरोधी पक्षांनीसुद्धा विचार केला पाहिजे.
वास्तविक महामार्गाच्या सुरुवातीलाच वनीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले होते. महामार्गासाठी येणाऱ्या खर्चापैकी दहा टक्के निधी वनीकरणासाठी असल्याचेही तेव्हा प्रसिद्ध झाले होते, पण मुळात दहा हजार कोटीचा असलेला या महामार्गाचा खर्च आता साडेपंधरा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही रक्कम केवळ महामार्गाच्या बांधकामासाठी आहे. वनीकरणाचा त्यात उल्लेखही नाही. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, कंपन्यांच्या सीएसआर निधीमधून वनीकरण करून घ्यावे, अशी सूचना श्री. गडकरी यांनी केली आहे. त्याअर्थी वाढीव निधीमध्ये वनीकरणाचा समावेश नाही. ते काही असले तरी वनीकरणाबाबत श्री. गडकरी यांनी केलेली सूचना त्यांची सूचना म्हणून नव्हे, तर कोकणाच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी अमलात आणायला हवी. एकदा वनीकरण झाले की नंतर टीका करण्यात काहीही अर्थ नाही. काही वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने अॅकॅशियाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. सर्वत्र हिरवाई दिसू लागली. पण या झाडांच्या लागवडीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याचे स्पष्ट झाले. तसे आता होता कामा नये. म्हणूनच आता महामार्गाच्या दुतर्फा आणि मधोमध कोकणाच्या वातावरणाला पूरक अशी झाडे लावली गेली पाहिजेत. तसे सुरुवातीपासूनच सांगितले गेले आहे. सातत्याने त्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे वनीकरण करून घ्यायचे असेल, तर ते स्थानिक स्वरूपातच होणार हे नक्की. त्यासाठी कोणताही कंत्राटदार नेमला जाणार नाही. म्हणूनच स्थानिक जातीची झाडे निवडणे आणि त्यांची लागवड करणे तसेच त्यांची जोपासना करणे ही कोकणवासीयांचीच जबाबदारी आहे. अन्यथा हा महामार्ग कोकणातून जाणारा तरीही उजाड महामार्ग ठरणार आहे. तसे होऊ नये यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करायला हवेत. कारण पर्यावरण ही कुठल्या एखाद्या पक्षाची, समाजाची, संघटनेची जबाबदारी नाही. ती सामूहिक जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने ओळखून प्रयत्न करायला हवेत. केवळ टीकाटिप्पणी आणि सूचना करण्यात काहीही अर्थ नाही.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ७ एप्रिल २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – ७ एप्रिल २०२३ रोजीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia7april
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : महामार्गाचे वनीकरण https://kokanmedia.in/2023/04/07/skmeditorial7april/
मुखपृष्ठकथा : गोंधळलेले गांधी आणि सावरकरांची अवहेलना : सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मनीष कुलकर्णी यांचा लेख
गौरव यात्रेच्या निमित्ताने सावरकरांच्या रत्नागिरीतील कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख
मस्त रसाळ मालवणी! : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…
या व्यतिरिक्त वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

