संकीर्तनातून रसिकांनी घेतला सांगीतिक समाधीचा अनुभव

मठ (ता. लांजा) : रागदारीवर आधारित गीतांच्या नृत्यांमधून साकारलेली कला अनुभवताना संकीर्तन या कार्यक्रमात रसिकांनी सांगीतिक समाधीचा अनुभव घेतला. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात १०७वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने मंगळवारी (चार एप्रिल) मिरज येथील रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या नृत्यश्री संस्थेने संकीर्तन हा कार्यक्रम सादर केला. गीतांवर आधारित समर्पक नृत्ये धनश्री आपटे आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी सादर केली. कार्यक्रमाची संकल्पना आणि माहितीपूर्ण निवेदन अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचे होते. कीर्तन आणि संकीर्तनाची कल्पना स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, की ‘कीर्तनात एक कीर्तनकार अनेकांना समजावून सांगणारे निरूपण करतो. ईशतत्त्व सांगतो, तर एकाच तत्त्वावर अनेकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्यक्त झालेला ईश्वर सादर करणे ही संकीर्तनाची संकल्पना आहे.’

रामदास स्वामींनी रचलेल्या सुखकर्ता दुःखहर्ता या पारंपरिक आरतीसह गणेशवंदनेच्या नृत्याविष्काराने प्रारंभ झाला. त्यानंतर १९१२ साली कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेल्या ‘मानापमान’ नाटकातील ‘नमन नटवरा’ आणि विद्याधर गोखले यांनी १९६७ साली लिहिलेल्या ‘जय जय गौरीशंकर’ नाटकातील ‘सप्तसुर झंकारत आली’ अशी संयुक्त नांदी भरतनाट्यम नृत्यशैलीमध्ये सादर करण्यात आली.

गांधर्व महाविद्यालय स्थापन करणारे आणि शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती झालेले अंध संगीतकार पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांची ‘ठुमक चलत रामचंद्र’ ही रचना सादर झाली. त्यावर रसिकांनी ठेका धरला. श्रीरामचंद्र कुपालू भजमन, तसेच शिवप्रसाद यांच्या आवाजातील मीराबाईंचा ‘मेरे तो गिरधर गोपाल’ हा अभंग सादर करण्यात आला. सावरकरांनी महाविद्यालयीन जीवनात लिहिलेली शिवाजी महाराजांची ‘जय देव जय देव जयजय शिवराया’ ही आरती आणि त्यांच्या कैदेच्या काळात केलेली ‘प्रभो शिवाजी राजा’ ही रचना या दोन रचनांवरील नृत्य सादर करण्यात आले. या गीतांविषयी निवेदन करताना सौ. जोगळेकर-कुलकर्णी यांनी सावरकरांच्या जीवनातील कौटुंबिक प्रसंग सांगितला. संपूर्ण कुटुंबाने एकत्र चित्रपट पाहण्याचा तो प्रसंग होता. अंदमानच्या तुरुंगात असताना आपण स्वातंत्र्याचा विचार कसा करत होतो, स्वातंत्र्यानंतर देशाचे चित्र कसे असेल, याचा विचार कसा करत होतो, देशासाठी काय काय करणे गरजेचे आहे, कोलू ओढताना आणि दगड फोडताना भविष्यातील राष्ट्राचे चित्र कसे असेल, याची स्वप्ने चित्रपटासारखी कशी पाहत होतो, हे सावरकरांनी सांगितले. एखाद्याच्या तंद्रीत शिरता आले असते, तर त्याला माझ्या डोळ्यांसमोरचा तो चित्रपट दिसला असता, असेही ते म्हणाले. स्वा. सावरकरांविषयी अनादर करणाऱ्या वक्तव्यांवरून सध्या सामाजिक वातावरण तप्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलेल्या या माहितीमुळे रसिकांचा सावरकरांविषयीचा आदर आणखी वाढायला मदत झाली.

भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित पंचमहाभूतांची म्हणजेच पंचतत्त्वांची आरती सौ. आपटे आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी सादर केली. पावणेपाच लाखांपेक्षा अधिक अभंगरचना करणारे संत पुरंदरदास यांची मराठीतील ‘जय जय विठ्ठल’ या गजराशी साधर्म्य दाखविणारी कन्नड भाषेतील रचना, संत कबीर यांची कुमार गंधर्वांच्या आवाजातील ‘उड जायेगा हंस अकेला’ या रचनेवर आधारित नृत्य, प्रथमेश लघाटे यांच्या आवाजातील ‘आम्ही लावियेला कैवल्याचा दीप’ या गीतावरील नृत्य वेधक होते.

निवेदन करतानाच सौ. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी नृत्यकलाकारांच्या वेषांची रंगसंगती, नृत्याविष्कारातून साकारणाऱ्या अभिजात शास्त्रीय नृत्याची ताकद, ओंकाराच्या साधनेचे महत्त्व सांगणाऱ्या एका गुरूच्या कथेसह रामायण, महाभारतातील पौराणिक कथांची पखरण, नामदेव, चोखामेळा यांच्या कथा सांगून निवेदन अत्यंत प्रवाही ठेवले. पूर्वाधात ईश्वराच्या सगुण रूपांचे आणि उत्तरार्धात त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाचे वर्णन करणाऱ्या नृत्यरचना सादर केल्याचे त्यांनी सांगितले. हा नृत्याविष्कार अखंड सुरू राहावा, असे वाटत असतानाच संकीर्तनाची सांगता झाली. रसिकांनी संकीर्तनाला उत्स्फूर्त दाद दिली.

उत्सवात दोन एप्रिल रोजी रात्री गायिका सौ. शिल्पा प्राणी-आठल्ये यांचा ‘स्वरशिल्प’ हा शास्त्रीय आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. त्या संगीत विशारद असून, त्यांनी संगीत हा विषय घेऊन एमए केले आहे. त्या आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकार आहेत. त्यांनी आतापर्यंत बेंगळुरू, विजापूर, इंदूर, दिल्ली, मुंबई अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहेत. सौ. आठल्ये यांनी लक्ष्मीपल्लीनाथाच्या उत्सवात सादर केलेल्या सर्व गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. सौ. आठल्ये यांना वरद सोहनी यांनी हार्मोनियमची, रामकृष्ण (प्रसाद) करंबेळकर यांनी तबल्याची, तर दर्शन मुळ्ये यांनी तालवाद्य साथ केली.

एक एप्रिलला रात्री अभिषेक काळे यांनी सादर केलेल्या ‘गीत रामायणा’तल्या निवडक गाण्यांमुळे एक वेगळाच माहौल तयार झाला. तीन एप्रिलला श्रीकांत सावंत यांनी सादर केलेला ‘स्वरश्रुती’ हा कार्यक्रमही असाच रंगला. सर्वच कार्यक्रमांना रसिकांची चांगली दाद मिळाली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply