देवरूख : येथील पत्रकार संदेश सुरेश सप्रे (वय ४२) यांचे मेंदूतील अतिरक्तस्रावामुळे आज दुपारी पनवेल येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
वडील बंधू समीर सप्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून संदेश सप्रे यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. त्यांनी दैनिक सकाळसाठी देवरूख येथील बातमीदार म्हणून काम केले. चिपळूण येथेही त्यांनी काही काळ काम केले. तेथील सागर दैनिकात काही काळ उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. देश आणि राज्य पातळीवर घडणाऱ्या विविध घटनांचा कोकणाशी ताळमेळ लावून तातडीने बातम्या देण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. अनेक जुने संदर्भही ते देत असत. राज्याचा आणि केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यात कोकणासाठी काय आहे, याची संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधून माहिती घेऊन ती त्याची बातमी देण्यात संदेश सप्रे आघाडीवर असत. रवींद्र माने, सुभाष बने, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, राजन साळवी, अशा स्थानिक नेत्यांसह नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू अशा अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क होता. केवळ संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर कोकणातील विविध घटनांचा मागोवा घेणारी अनेक वार्तापत्रे त्यांनी लिहिली. विविध संस्था आणि संघटनांशी त्यांचा सततचा संपर्क होता. अलीकडे ते तरुण भारत दैनिकासाठीही बातमीदार म्हणून काम करत होते. संगमेश्वर न्यूज हा ग्रुप त्यांनी सुरू केला होता. त्याचे ते संपादक होते. साप्ताहिक कोकण मीडियासाठीही ते भरीव मदत करत असत. हरहुन्नरी पत्रकार अशी त्यांची ओळख होती.
महिला बचत गटासंबंधी केलेल्या लेखनासाठी त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला होता. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा दर्पण पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
उपजीविकेचे साधन म्हणून संगमेश्वर आणि देवरूख येथे ते उपाहारगृह चालवत असत.
आपली नियमित तपासणी आटोपून ते पुण्यातून पनवेल येथे आपल्या बंधूकडे गेले होते. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना पनवेल येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच मेंदूतील अतिरक्तस्रावामुळे त्यांचे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
संदेश सप्रे यांचा मृतदेह देवधामापूर (ता. संगमेश्वर) येथे आणण्यात येणार असून तेथून उद्या (दि. ६ एप्रिल) सकाळी ७ वाजता अंत्ययात्रा निघेल, असे बंधू चिंतामणी सप्रे यांनी कळविले आहे.
संदेश सप्रे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन कन्या, बंधू आणि त्यांचा परिवार आहे.
संदेश सप्रे यांच्या निधनामुळे केवळ संगमेश्वर न्यूजचा आवाज थांबला नसून संगमेश्वर तालुक्यातील बातम्या आणि घटना-घडामोडींचा सर्वांत मोठा स्रोत संपल्याची प्रतिक्रिया पत्रकारितेच्या क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

