Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत १२ एप्रिलला सायंकाळी सावरकर गौरव यात्रा

Advertisements

रत्नागिरी : भाजप-शिवसेना युतीच्या वतीने राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. त्या उपक्रमाचा भाग म्हणून रत्नागिरी शहरामध्ये बुधवारी, १२ एप्रिल २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभर राबवला जात आहे.

१२ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता रत्नागिरी विशेष कारागृहापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेची सुरुवात होणार आहे. तिथून मुख्य रस्त्याने आंबेडकर पुतळा-जयस्तंभ- एसटी स्टँड-राम आळी-गोखले नाका-सावरकर पुतळा-लक्ष्मी चौक असा या यात्रेचा मार्ग असेल. यात्रा लक्ष्मी चौक येथे पोचल्यावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान लक्ष्मी चौक मैदानामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांचा व महाराष्ट्र स्फूर्तिगीतांचा ‘जयोस्तुते’ हा कार्यक्रम होणार आहे.

या यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचे चित्ररथ, ढोलपथके याचबरोबर विविध मंदिरांचे विश्वस्त, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सावरकरप्रेमी नागरिक यांच्यासह शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहात या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

रत्नागिरी ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी! इथल्या विशेष कारागृहातल्या कोठडीमध्ये त्यांनी कारावासही भोगला. दानशूर भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या पतित पावन मंदिरामध्ये सावरकरांनी सहभोजनाचा परिपाठ सुरू केला आणि हे मंदिर सर्वांसाठी खुले केले. यामुळे रत्नागिरीकरांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे विचार प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत. सावरकरांच्या कर्मभूमीमध्ये होत असलेल्या या गौरव यात्रेमध्ये समस्त रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येन सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, यांनी तसेच शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version