पनवेल : येथील के. गो. लिमये सार्वजनिक ग्रंथालयात जानेवारी २०२४ मध्ये तिसरे राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन होणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे.
संमेलनाच्या नियोजनासाठी झालेल्या सुमारे पाच तासांच्या बैठकीत ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतील पन्नासहून अधिक प्रमुख साहित्यिक उपस्थित होते. या पहिल्या सभेच्या अध्यक्षस्थानी कांतिलाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू होते. व्यासपीठावर ज्येष्ठ गजलकर प्रशांत वैद्य, लेखक आणि वकील विलास नाईक, बंडू अंधेरे, हेमंत राजाराम, सुधीर चित्ते, श्वेता दामोदर आदी मान्यवर उपस्थित होते. निमंत्रक गजलकार बंडू अंधेरे यांनी प्रास्ताविक केले आणि कवी, सूत्रसंचालक डॉ. राजेंद्र राठोड यांनी सभेचे उद्देश स्पष्ट केले.
राज्यस्तरावर मराठी साहित्य संमेलन आणि अनेकविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून घेण्याचे या सभेत ठरले. या विषयावर अनेक साहित्यिकांनी आपापली स्पष्ट मते नोंदवली. बालसाहित्य दालन, वाचक कट्टा, हास्य कविसंमेलन, बोलीभाषा कट्टा, प्रस्थापितांचे अप्रकशित साहित्य अशा अतिशय उपयुक्त आणि अनेकविध विषयांवर प्राथमिक चर्चा होऊन हे सारे विषय संमेलनात अंतर्भूत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असे सर्वानुमते ठरले. मुख्य संमेलनाचा कालावधी, कार्यक्रमांचा कालावधी, नवोदितांना संधी यासोबतच राज्यातील शक्य त्या ठिकाणी काही मासिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, असेही सुचविण्यात आले.
विलास नाईक यांनी नव्या संस्थेचे नाव, नोंदणी व एकंदरीत वाटचालीविषयी कायदेशीर मार्गदर्शन केले, तर आयोजक कांतीलाल कडू यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत संमेलन आणि मासिक कार्यक्रम, जिल्हा तालुका पातळीवरील पदाधिकारी या बाबींचा ऊहापोह केला. साहित्यिकांनी आपापसात काही वादविवाद असतील तर ते बाजूला ठेवून या साहित्यसेतूचा चिरा होऊन स्वच्छ मनाने सामील होऊन आपण काम करू या, असे आवाहन केले.
सभेत मनुष्यबळ, रसिक, श्रोते, साहित्याची गोडी वाढविणे, दर्जात्मक आणि सक्षम, सकस साहित्याच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि संमेलनाचा दर्जा राखणे याबाबत एकमत झाले. नाशिक, माणगाव, ठाणे, मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली, पुणे, रायगड इत्यादी ठिकाणांहून या सभेत साहित्यिक सहभागी झाल्याने पुढच्या वर्षीपासून संमेलनाची व्याप्ती वाढणार आहे.
बैठकीत गुरुदत्त वाकडेकर, संजय गुरव, संग्राम दावणगावेकर, प्रशांत वैद्य, सुधीर चित्रे, नागेश नायडू, हेमंत राजाराम, अॅड. विलास नाईक, केशव कासार, उमेश जाधव, पुंडलिक म्हात्रे, राजेंद्र नाईक, चंद्रसेन जाधव, श्वेता दामोदर, जितेंद्र लाड, वैभव वऱ्हाडी, संदीप कळंबे, संजय गुरव, पांडुरंग जाधव, रघुनाथ पोवार आदींनी महत्त्वपूर्ण सूचना मांडून सभेतील सहभाग अधोरेखित केला.
सभेत सर्वानुमते निर्माण करण्यात आलेल्या संभाव्य संस्थेचा मसुदा तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये प्रशांत वैद्य, हेमंत राजाराम, केशव कासार, नागेश नायडू, श्वेता दामोदर, प्रियांका जठार, संजय गुरव, अॅड. विलास नाईक, पुंडलिक म्हात्रे, चंद्रसेन जाधव आणि सुधीर चित्ते यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या नियोजनाची पुढील सभा जून महिन्यात होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

