मुंबई : बदलत्या मनोरंजन तंत्रज्ञानाने सामाजिक स्वास्थ्य बिघडून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ माध्यमकर्मी नितीन वैद्य यांनी व्यक्त केले.
दादर येथील अमरहिंद मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ७६ व्या वसंत व्याख्यानमालेत ते ‘मनोरंजनाची बदलती दुनिया’ या विषयावर विचारपुष्प गुंफत होते. दूरदर्शनपासून २०१२ पर्यंतचा काळ त्यांनी फार जवळून अनुभवला असल्याने त्यांनी याबाबतीत आपले परखड मत मांडले.
ते म्हणाले, २०१४ नंतर टीव्ही आणि मोबाइलच्या माध्यमातून डिजिटल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर जगभर क्रांती झाली आहे. तंत्रज्ञान लाटेसरशी आपल्यावर येत असून त्याच्या भोवऱ्यात आपण सापडलो आहोत. आपल्या एकाच घरात कमालीची द्वेषभावना वाढत असून एका बाजूने आपण तर दुसऱ्या बाजूने कुणीतरी विरोधी बाजू घेऊन अतार्किक बोलत असतो. मनोरंजन हे आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असले तरी धोक्याची घंटा म्हणून त्याच्याकडे सावधपणे लक्ष द्यायला हवे. कारण हिंसा, द्वेष आणि लैंगिकता पसरवण्याचा तो सोपा धागा आहे. पौंगडावस्थेतील मुलांपेक्षाही लहान मुलांच्या हातात मोबाइल किती द्यायचा, हेही ठरवायला हवे. मोबाइल बाजूला ठेवून किमान दोन तास ती मैदानात कशी खेळतील याचा विचार करणे काळाची गरज आहे असे मत श्री. वैद्य यांनी मांडले.
ते पुढे म्हणाले, टेलिव्हिजन होते, तेव्हा घरातील सगळे सदस्य एकत्र बसून कार्यक्रम बघायचे. २०१० नंतर जी डिजिटल क्रांती भारतात आली, त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक वेगळा झाला. स्वतंत्र झाला. त्यामुळे त्याच्या आवडीनिवडीदेखील बदलत गेल्या. या क्रांतीमुळे मोबाइल, स्मार्टफोन, इंटरनेट स्वस्त झाले आणि यामुळेच एकाच घरात एकाच टेलिव्हिजनवर एक कार्यक्रम बघणारी ४ माणसे आता ४ वेगवेगळ्या ठिकाणी बसून आपापले आवडते कार्यक्रम पाहू लागली आहेत. एक प्रकारे धोक्याची घंटा दारात नसून घरात आली आहे. डिजिटल क्रांतीमध्ये महाराष्ट्र नेहमीच पहिल्या नंबरवर होता. पुढे येणाऱ्या काळातही महाराष्ट्र त्याचे स्थान अबाधित राखेल, अशी आशा असली तरी पिढ्यानपिढ्या संस्कृतीने उदारमताचा जपलेल्या महाराष्ट्र धर्माच्या विचाराला बाधा येणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
(रवींद्र मालुसरे)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

