वालावल (ता. कुडाळ) : प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विविध तीन गटांमध्ये श्रुती सावंत, हर्ष नकाशे आणि सौ. ईश्वरी तेजम यांची स्वरसिंधुरत्न पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.
कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कै. प्रभू यांनी स्वरसिंधुरत्न स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वालावल (ता. कुडाळ) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात स्पर्धा पार पडली. सायंकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
गटनिहाय विजेते असे – पहिला गट (११ ते १६ वर्षे शालेय) – श्रुती सावंत, स्वरांगी गोगटे, तेजल रवींद्र गावडे, दुसरा गट (१७ ते ३५ वर्षे – युवा गट) – हर्ष नकाशे, पल्लवी संजय पिळणकर, हर्षल सगुण मेस्त्री, तिसरा गट (३५ वर्षांवरील सर्वांसाठी खुला) – सौ. ईश्वरी तेजम. पहिल्या गटात ९ (श्रुती शरद सावंत, ओजस्वी संजय पिळणकर, अनुष्का अभिजित आपटे, सोहम दिनेश साळसकर, गीता सोपान गवंडे, स्वरांगी मिलिंद गोगटे, भाविक गजानन मेस्त्री, तेजल रवींद्र गावडे आणि सारा संजय मणेरीकर), दुसऱ्या गटात ८ (गौरी बाबू पारकर, सानिका संजय गावडे, संपदा अनिल दुखंडे, हर्ष संजय नकाशे, शुभम उमेश राणे, वैष्णवी दत्तप्रसाद प्रभू, पल्लवी संजय पिळणकर आणि हर्षल सगुण मेस्त्री), तर तिसऱ्या गटात सौ. ईश्वरी तेजम आणि निखिल रघुनाथ प्रभू दोघा स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रदीप धोंड आणि मुग्धा भट-सामंत यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
तिन्ही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्वरसिंधुरत्न पुरस्कार रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र या स्वरूपात असेल. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
सायंकाळी सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मैफलीत श्रोते रंगून गेले. शास्त्रीय संगीताने प्रारंभ करून त्यांनी निवडक भक्तिगीते सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीत किशोर सावंत (तबला), प्रणव मेस्त्री (पखवाज) आणि नीलेश मेस्त्री (हार्मोनियम) यांनी संगीतसाथ केली. मैफलीदरम्यान दिलीप ठाकूर, लक्ष्मीनारायण मंदिर संस्थेचे गुरू देसाई, अर्चना परब आणि प्रकाश चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संयोजक प्राचार्य प्रशांत धोंड, डॉ. प्रणव प्रभू, ध्वनिव्यवस्था सांभाळणारे किरण नाईक आणि गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांनाही गौरविण्यात आले.
स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे वितरण आषाढी एकादशीला (दि. २९ जून २०२३) रोजी श्री क्षेत्र वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. स्वरसिंधुरत्न पुरस्कार मिळालेल्या तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्वांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम त्यादिवशी सायंकाळी होणार आहे.


