कुडाळ : राज्यातील अंध, दिव्यांग, अॅसिड हल्लाग्रस्तांसहित विविध वंचित घटकासोबत काम करणारी श्रीरंग फाउंडेशन ही संस्था ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ‘मायलेकीं’च्या कौतुकाचा सोहळा साजरा करणार आहे. हा कार्यक्रम १३ मे २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थानात होणार आहे.
अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली-नानी आणि तिची लेक, महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपत आपल्या प्रदेशातील पांरपरिक लोककलेला एक वेगळी ओळख देऊ त्या कलांचे संवर्धन करणारी अर्चना आणि तिची माय, आपली संस्कृती जपणारी नऊवारी साडी नेसून आजपर्यंत नव्वदहून अधिक किल्ले सर केलेल्या सुवर्णा वायंगणकर आणि तिची माय, जगातल्या रंजलेल्या गांजलेल्या प्रत्येकाच्या वेदनेवर मायेचे मलम लावणाऱ्या श्रद्धाताई आणि त्यांची माय, वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगावर मात करून स्वत:चा ‘तळेकरीण’ ब्रँड निर्माण करणारी वर्षा तळेकर आणि तिची माय, लोककला, बोलीभाषा विषयातील आरती परब आणि त्यांची लेक… अशा मायलेकींच्या कर्तृत्वाचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.
मायलेकींचे नाते हे जगाला माया, ममता, करुणेसह जिद्द, कर्तृत्वही दाखवते, हे या मायलेकींच्या कहाणीतून दिसते. त्यांची कहाणी जगासमोर यावी, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी, यासाठी श्रीरंग फाउंडेशनने याकरिता पुढाकार घेतला अशी माहिती संस्थापक सुमित पाटील यांनी दिली.

