स्वरसिंधुरत्न स्पर्धेला वालावलमध्ये सुरुवात

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेली सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आज (१३ मे २०२३) सकाळी सुरू झाली आहे.
वालावल (ता. कुडाळ) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात स्पर्धेला प्रारंभ झाला. विजेत्यांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

प्रदीप धोंड आणि मुग्धा भट-सामंत हे दोन्ही परीक्षक, स्पर्धेचे संयोजक प्राचार्य प्रशांत धोंड, डॉ. प्रणव प्रभू, संदीप तेंडुलकर, किरण नाईक, प्रसाद मेस्त्री, वालावलच्या लक्ष्मीनारायण ट्रस्टचे गुरू देसाई, दयानंद चौधरी आदी या वेळी उपस्थित होते. स्पर्धा तीन गटांत होणार असून पहिल्या गटाच्या स्पर्धेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. लक्ष्मीनारायणाला श्रीफळ अर्पण करून स्पर्धेचा श्रीगणेशा करण्यात आला. (छोटा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कै. प्रभू यांनी स्वरसिंधुरत्न स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

गट क्र. १ : ११ ते १६ वर्षे पूर्ण (शालेय गट), गट क्र. २ : १७ ते ३५ वर्षे पूर्ण (युवा गट), गट क्र. ३ : ३५ वर्षांवरील (खुला गट) अशा तीन गटांत स्पर्धा होत आहे. तिन्ही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येईल. स्वरसिंधुरत्न पुरस्कार रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र या स्वरूपात असेल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल.

स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे वितरण आषाढी एकादशीला (दि. २९ जून २०२३) रोजी श्री क्षेत्र वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. विजेत्यांना तेथील नियोजित कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी दिली जाईल. सादरीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply