साहित्य चळवळीला चालना

कोकणात साहित्य चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली आहे. अनेक साहित्यिक कोकणाने घडवले आहेत. साने गुरुजी कथामाला, दक्षिण रत्नागिरी जिल्हा साहित्य संघ, सिंधुदुर्ग साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी साहित्य परिषद अशा विविध साहित्यिक संस्था, संघटना कोकणात पूर्वीपासून काम करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेपाठोपाठ मराठी साहित्य परिषदेच्याही अनेक शाखा कोकणात ठिकठिकाणी स्थापन झाल्या आहेत. त्यात आता अखिल भारतीय साहित्य परिषद या देशपातळीवरील साहित्य संस्थेची भर पडणार आहे. कोकणातील साहित्य चळवळीला देशपातळीवर स्थान देऊ शकणाऱ्या या संस्थेचे स्वागत करायला हवे.

दिल्लीत १९६६ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांताची पहिली बैठक मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात पार पडली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात या परिषदेची शाखा सुरू करण्याबाबत विचार झाला. लवकरच ही शाखा अस्तित्वात येईल. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी साहित्य परिषद कार्यरत असताना तसेच साहित्यविश्वाच्या कारभाराला ओटी लागली असताना अशा आणखी एका साहित्य परिषदेची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण वेगवेगळ्या साहित्य परिषदा एकमेकांच्या विरोधात असल्याचे काहीसे वातावरण आहे. त्याला छेद देऊन त्यापलीकडे केवळ महाराष्ट्र आणि मराठी भाषा नव्हे तर देशभरातील अन्य भाषांपर्यंत पोहोचण्याचे एक व्यासपीठ म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषदेकडे पाहता येईल. देशातील २४ भाषांशी ही साहित्य परिषद जोडली गेली आहे. साहित्य व्यवहारालाच ओहोटी लागली असल्याचे मानले जात असले तरी याच काळात अशा परिषदेची आवश्यकता भासू लागली आहे. ती या परिषदेमार्फत पूर्ण होऊ शकेल.

कोकण रेल्वेचे आगमन झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात स्थानिक संगमेश्वरी, मालवणी आणि मराठी बोलीच्या पलीकडे हिंदी भाषेतील संवादही होऊ लागले आहेत. त्याचबरोबर दक्षिणेतील राज्यांमधील अनेक लोक नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने रत्नागिरीत स्थायिक झाले आहेत. विशेषकरून कन्नड आणि मल्याळी भाषा बोलणाऱ्यांचा समाज एकत्र येतो आणि आपापले कार्यक्रम सादर करत असतो. त्याला भाषेमुळे प्रादेशिक मर्यादा येतात. पण अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्य रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले, तर या विविध भाषिकांना एकत्र आणता येईल. एका व्यासपीठावर त्यांना आणता येऊ शकेल. भाषिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम एकत्रित करता येऊ शकतील. वैचारिक आदानप्रदानही होईल. विविध भाषांमधील साहित्य मराठीमध्ये आणि मराठीतील साहित्य विविध भाषांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल. साने गुरुजींनी भाषाभगिनींची कल्पना मांडली होती. त्यासाठी त्यांनी काम केले होते. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ अशी क्रांतीची तरीही समानतेची शिकवणूक देणाऱ्या साने गुरुजींनी भारतात सदैव शांतता नांदावी, म्हणून ‘आंतरभारती’ची संकल्पना मांडली. प्रांतांचा परस्परांशी आणि भारताशी प्राणमय संबंध म्हणजे आंतरभारती. भारतीय माणसाने जात, धर्म, पंथ, प्रांत यांसारख्या संकुचित भावनांमध्ये गुंतून पडू नये. आपले कुटुंब हे कोट्यवधींचे कुटुंब आहे. प्रांतांच्या सीमांचे भाग हे नद्यांच्या संगमाप्रमाणे तीर्थक्षेत्रे मानली जावीत. प्रत्येकाने तीन-चार भाषा शिकाव्यात. भाषाभगिनी आणि संस्कृतीचा सुरेख संगम व्हावा, भारतीय माणूस अंतर्बाह्य भारतीय असावा, असे त्यांचे विचार होते. एकमेकांच्या भाषा शिकल्यानंतर बहुभाषिक लोक एकत्र येतील आणि त्यांच्यामध्ये समभाव निर्माण होईल, असा त्यांना विश्वास होता. त्यांच्याच जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेची शाखा सुरू झाल्यानंतर त्यांच्या स्वप्नातील भाषाभगिनींचे कार्य पुढे न्यायला मदत होऊ शकेल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १२ मे २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply