देवगड : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे येत्या १७ मे रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी, १७ मे रोजी सकाळी १० वाजता पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील संस्थेच्या ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्रींच्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड येथील प्राध्यापक राजेंद्र मुंबरकर आणि फलटण येथील कवी ताराचंद्र आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींच्या काव्यमैफिलीचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे साहित्यातील कार्य आणि योगदान तसेच त्यांच्या ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून प्रकाशित काव्यरचनेचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या या कार्याला अभिवादन म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्यमैफिलीस उपस्थित राहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींनी आपली एक काव्यरचना सादर करून बाळशास्त्रींना अभिवादन करावे. उपस्थित कवींना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. काव्यरचना सादर करताना कविता कोणाच्याही भावना दुखावणारी अथवा कोणत्याही महान व्यक्तीवर टीका करणारी नसावी, याची दक्षता कवींनी घ्यावी. कविता सादर करण्याकरिता नावनोंदणी आवश्यक असून यासाठी कवींनी तळेरे (जि.सिंधुदुर्ग) येथील पत्रकार आणि प्रसिद्ध पत्रसंग्राहक निकेत पावसकर (98609 27199) आणि संस्थेचे विश्वस्त अमर शेंडे (9922778386) यांच्याशी संपर्क साधावा.
या अभिवादन कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक तसेच वृत्तपत्रप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे करण्यात आले आहे.
(महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर; लेखक : यशवंत पाध्ये; प्रकाशक : राजे पब्लिकेशन्स) (हे पुस्तक ‘ई-बुक’ स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media

