वालावल (ता. कुडाळ) : राज्यातील अंध, दिव्यांग, अॅसिड व्हिक्टिमसहित विविध वंचित घटकांसोबत काम करणाऱ्या श्रीरंग फाउंडेशनने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने मायलेकींच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला. वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात हा सोहळा साजरा झाला.
अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली-नानी आणि तिची लेक, महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपत आपल्या प्रदेशातील पारंपरिक लोककलेला एक वेगळी ओळख देत त्या कलांचे संवर्धन करणारी लोककला बोलीभाषा जपणारी अर्चना परब आणि तिची आई आरती परब, आपली संस्कृती जपणाऱ्या नऊवारी साडी नेसून आजपर्यंत नव्वदच्या वर किल्ले सर केलेल्या सुवर्णा वायंगणकर आणि तिची आई लक्ष्मी वायंगणकर, रंजलेल्या गांजलेल्या प्रत्येकाच्या वेदनेवर मायेचे मलम लावणाऱ्या श्रद्धा कदम ताई आणि त्यांची आई, वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करत स्वत:चा ‘तळेकरीण’ ब्रॅण्ड निर्माण करणारी वर्षा तळेकर आणि तिची आई वैशाली, तृतीयपंथीय असूनही उच्चशिक्षित बनून स्वतःची वेगळी ओळख बनवणारी निष्ठा गोसावी आणि या सगळ्या प्रवासात आपल्या मुलीला भक्कम आधार देणारी तिची आई सुप्रिया गोसावी अशा मायलेकींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला.
मायलेकींचे नाते जगाला माया, ममता, करुणेसह जिद्द, कर्तृत्वही दाखवते, हे या मायलेकींच्या कहाणीतून दिसते. त्यांची कहाणी जगासमोर यावी, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी, यासाठी श्रीरंग फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याचे संस्थापक सुमित पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सत्कारमूर्तींसह श्रीरंग फाउंडेशनचे संस्थापक सुमित पाटील, गुरू देसाई, प्रकाश चौधरी, विश्वस्त, डॉ. प्रणव प्रभू आणि वालावलचे ग्रामस्थ उपस्थित होते.
….
असे होते मानपत्र
लेकीचा जन्म हा आईला पुनर्जन्माप्रमाणे वाटतो.. बालपणापासून आई होण्यापर्यंतच्या प्रवासात मागे राहिलेली तिची असंख्य स्वप्ने लेकीच्या रूपाने पूर्णत्वास येत असतात. एक हृदय असलेल्या दोन शरीरात प्रेम, करुणेसह नव्या गोष्टी शिकण्याची ऊर्जा, गगनभरारी घेण्याची जिद्द तीच असते. त्यामुळे ‘मायलेकी’ एकत्र येतात, तेव्हा अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सहज सोप्या वाटू लागतात. लेकीच्या उमेदीला आईच्या अनुभवाची साथ लाभली तर भवासागरही लीलया तरून जातो, याची प्रचीती आपल्याला आजूबाजूला पाहून होत असते. स्वतःचे आयुष्य समृद्ध करून जगाला प्रेरणा देणाऱ्या अशाच मायलेकींचा आपण श्री लक्ष्मी नारायण देवस्थान (वालावल) आणि श्रीरंग फाउंडेशन (मुंबई) यांच्या माध्यमातून सन्मान करीत आहोत. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत कला, व्यवसाय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मायलेकींचा गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
………
कोण होत्या सत्कारमूर्ती?
१. अर्चना परब-आरता परब
महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपत आपल्या प्रदेशातील पारंपरिक लोककलेला एक वेगळी ओळख देत त्या कलांचे संवर्धन करणारी आरती परब ही माता, वारसा जपताना तो पुढील पिढीला जपायला प्रवृत्त करणे हेही तितकेच महत्त्वाचे आणि म्हणूनच संवर्धनाचे धडे देत अर्चनाला त्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले. संस्कृती आणि भाषेचे रक्षण या करणाऱ्या या मायलेकींचा अभिमान वाटतो. आपल्या सांस्कृतिक लोककला आणि बोलीभाषा जपत महाराष्ट्र समृद्ध करणाऱ्या या मायलेकी आहेत.
२. नानी गावडे-विनीता गावडे
अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली म्हणजेच नानी (इंद्रायणी गावडे). आयुष्यात दुःखांचा, संकटांचा ठेचा करून त्यावर समाधानाची पाखरण करत नैसर्गिकपणे शिजवलेली भाजी-भाकरी वाढून प्रत्येकला तृप्त करतेय, आरोग्याचा कानमंत्र देतेय. साखर आणि मिठासारखी हळुवार पेरणी करत मोजक्या शब्दांत आयुष्याचे सारे समजावतेय. दुधावरच्या सायीसाखी नाती जपत सुनेलाही लेकीची माया देऊन ही सासू-सून संसाराच्या गाडीची दोन चाके बनली आणि संसाराचा गाडा पुरुषाशिवाय चालवून दाखवला. त्यांची सूनही (विनीता गावडे) ढासळत जाणार्या जीवनशैलीच्या जमान्यात नैसर्गिक खाद्यसंस्कृती जपतेय. स्वतःचे आयुष्य समृद्ध करून जगाला प्रेरणा देणाऱ्या या मायलेकी आहेत.
३. सुवर्णा वायंगणकर-लक्ष्मी वायंगणकर
शेतकरी कुटुंबातील लक्ष्मी वायंगणकर ही माऊली. आपल्या लेकीला सुवर्णाला शिवाजी महाराजांच्या कथा सांगत शिवबीज रोवत होती. त्यातूनच गडकिल्ल्यांबद्दल आकर्षण निर्माण झाले. किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या सुवर्णा वायंगणकर यांनी आजपर्यंत नव्वदपेक्षा अधिक किल्ले आपली संस्कृती जपणारी नऊवारी साडी नेसून सर करत त्यांच्या संवर्धनाचे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि किल्ले जपत महाराष्ट्र समृद्ध करणाऱ्या या महाराष्ट्रातील मायलेकी.
४. श्रद्धा ताई
जिचे हृदय प्रेमाने भरलेले असते, ती आई असते. मग मूल कोणाचेही असो, ज्याच्या वेदना बघून जिच्या डोळ्यांत पाणी येते, ती आईच असते. जगाने नाकारलेल्या छोट्यांपासून वृद्धांची माता बनली ती श्रद्धा ताई कदम. जगातल्या रंजल्या गांजलेल्या प्रत्येकाला तिने जवळ केले. त्यांच्या वेदनेवर मायेचे मलम लावले. त्यांना आपलेसे केले आणि जगायला बळ दिले. आपली दुःखे बाजूला ठेवून दुसर्यांच्या दुःखाचा भार हलका करणे सोपे नसते. त्यासाठी खूप मोठे हृदय लागते. दुसर्यांच्या सुखात आपले सुख शोधणाऱ्या या अनाथांच्या आई.
५. वर्षा तळेकर-लक्ष्मी तळेकर
लग्नानंतर मुलगी परकी होते, असा आपल्या समाजाचा नियम आणि समज. पण हे डावलून कुठल्याही कठीण परिस्थितीत मी कायम माझ्या मुलीसाठी उभी राहीन, ही भूमिका म्हणजेच खऱ्या अर्थाने तिला आधार देणे. आयुष्यात रंगीबेरंगी स्वप्ने बघताना अचानक काहीतरी अप्रिय घटना घडून आयुष्याची चवच निघून जाते. आयुष्यातीत कठीण प्रसंगाने निराश झालेल्या मुलीला वर्षाला परत एकदा भरारी घ्यायला तिच्या आईने लक्ष्मी तळेकर यांनी शिकवले. आज अगदी कमी वेळात स्वतःचा ऐक आगळावेगळा ब्रॅण्ड घेऊन ही मुलगी लोकांच्या आयुष्यात चव आणायचे काम करत आहे. आईचा आधार असेल तर कठीण काहीच नसते. स्वतःचे आयुष्य समृद्ध करून कन्या वर्षा तळेकरसह जगाला प्रेरणा देणाऱ्या या मातेला सलाम.
६. निष्ठा निशांत गोसावी
तृतीयपंथीय असूनही उच्चशिक्षित बनून स्वतःची वेगळी ओळख बनवणारी निष्ठा निशांत गोसावी मुंबई विद्यापीठाची पदवीधर आहे. तिने फुलांमध्ये आणि प्रामुख्याने अबोलीच्या फुलावर संशोधन केले आहे. ह्युमन जेनेटिक्सचा तिचा अभ्यास आहे. एका संस्थेत ती शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. तृतीयपंथीयांच्या प्रश्नांबाबत जनजागृतीचे काम ती करते. तृतीयपंथीयांसाठी निर्माण केलेल्या गरिमा गृहाचे व्यवस्थापन ती करते. तृतीयपंथी लोक रस्त्यावर राहू नयेत, त्यांनी रस्त्यावर फिरू नये, काम करावे, यासाठी ही संस्था काम करते. तृतीयपंथीयांसाठी तेथे निवारा उभारण्यात आला आहे. स्वतः तृतीयपंथी असलेच्या निष्ठाची आई तशी मुले असलेल्या पालकांचे प्रबोधन सातत्याने करते.










