Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

तायक्वांदो संघटनेचे संकेतस्थळ लवकरच

Advertisements

रत्नागिरी : तायक्वांदो संघटनेचे प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत पदाधिकारी, प्रशिक्षक यांची माहिती मिळण्यासाठी आता तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात ताम स्वतःची वेबसाइट सुरू करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे आणि महासचिव मिलिंद पाठारे यांनी दिली.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे रत्नागिरीत इथल्या जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय पंच सेमिनार आणि ब्लॅक बेल्ट Dan परीक्षा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता असलेली राष्ट्रीय संघटना राज्याच्या ज्या संघटनेला मान्यता देईल, ती संघटना राज्याची अधिकृत संघटना म्हणून घोषित होते. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रला आता अधिकृत संघटनेची ओळख मिळाली असून अधिकृत संघटनेतून खेळण्याचा फायदा खेळाडूंना मिळावा, या उद्देशाने वेबसाइट सुरू केली जाणार आहे. त्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत पदाधिकारी कोण यांची माहिती दिली जाईल.

अधिकाधिक उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देण्यासठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. बारगजे यांनी यावेळी सांगितले. खेळातील नवीन बदल अंगीकारत खेळ पुढे नेण्यासाठी हे निश्चित फायदेशीर ठरणार असल्याचे राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटेश कररा यांनी नमूद केले.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते मार्गदर्शक प्रवीण बोरसे यावेळी उपस्थित होते.

तीन ‘ सी ‘ तायक्वांदोमध्ये यशस्वी होण्यासाठी गरजेचे – आंतरराष्ट्रीय पंच नवीनचंद्र


तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे रत्नागिरीमध्ये प्रथमच पंच परीक्षा पार पडली. परीक्षेचे आयोजन हे एक रोल मॉडेल असून बाकीच्या आयोजकांनी ते जरूर अवलंबावे, असे कौतुकोद्गार या परीक्षेसाठी प्रशिक्षक म्हणून आलेले आंतरराष्ट्रीय पंच नवीनचंद्र यांनी काढले. खेळामुळे व्यक्ती घडत असते आणि व्यक्तिमत्त्व विकासदेखील होत असतो. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी आणि कम्युनिकेशन हे तीन सी तायक्वांदोमध्ये यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहेत. प्रत्येकाने हे आचरणात आणावेत, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
बंगळूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले नवीनचंद्र चौथीत असताना तायक्वांदोशी जोडले गेले. खेळाडू, स्वतःची अकादमी ते आंतरराष्ट्रीय पंच या प्रदीर्घ प्रवासात आईवडिलांनी भक्कम पाठिंबा दिला. आपल्या यशात प्रशिक्षक पी. एल. एन. मूर्ती आणि श्रीनाथ प्रल्हाद यांचा फार मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतातील तायक्वांदो आता जागतिक स्तरावरच्या तायक्वांदोसोबत पुढे जात आहे. मात्र अद्यापही कराटे आणि तायक्वांदो यातील फरक अनेकांना समजत नाही. त्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचून या खेळाचे नेमकेपण समजावून सांगणे गरजेचे आहे. भारतात गुणवत्तेची कमतरता नाही. त्याला राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर निश्चितच भारतातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला तिरंगा फडकवू शकतात.

येणाऱ्या पाच वर्षांत ऑलिम्पिकमध्ये भारताचे स्थान आघाडीवर आणण्याचे ध्येय असेल, असे प्रतिपादन नवीनचंद्र यांनी केलं. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने पुमसे आणि क्योरोगी दोन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम बघणारे नवीनचंद्र यांनी जागतिक पातळीवर टॉप सिक्समध्ये येण्याचा बहुमान मिळवला. जे ज्ञान मला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाल आहे, ते आता भारतातील प्रत्येक इच्छुक खेळाडूपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

खेळाडूंच्या आहाराबद्दल बोलताना ते म्हणाले, जगातील प्रत्येक आई आपल्या मुलासाठी उत्तम आहार तज्ज्ञ असते. आपल्या घरात शिजवलेले ताजे, सकस अन्न हाच उत्तम आहार असून त्याव्यतिरिक्त खेळाडूंना कोणत्याही विशिष्ट आहाराची गरज नाही. खेळाडूंनी जंक फूड खाणे टाळावे, असा सल्ला देतानाच ते म्हणाले की, मुले-मुली नैसर्गिकरीत्या आपल्या वयानुसार ज्या ज्या वजनी गटात असतील त्याच वजनी गटात त्यांनी खेळावे. उपलब्ध साधने कोणती आहेत यापेक्षा तुमची आत्मसात करण्याची शक्ती किती उत्तम आहे, यावरच खेळ बहरतो, या मुद्द्याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.
मुलांच्या तुलनेत मुलींना आंतरराष्ट्रीय पंच होणे अधिक सोपे आहे. त्यामुळे मुली केवळ अठरा वर्षे पूर्ण आणि फर्स्ट dan ब्लॅक बेल्ट झाल्या की आपल्या गुणवत्तेवर आंतरराष्ट्रीय पंच म्हणून परीक्षेत यश मिळवून काम करू शकतात. या संधीकडे मुलींनीही अधिक गांभीर्याने बघायला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version