जागतिक टूर ऑपरेटर्सच्या मेळाव्यात रत्नागिरी सहभाग घेणार

रत्नागिरी : येत्या मार्च महिन्यात मुंबईत होणार असलेल्या जगभरातील प्रसिद्ध टूर ऑपरेटर्सच्या ट्रॅव्हल मार्ट मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन सहभागी होणार आहे. येथील हॉटेल लँडमार्कमध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.

या ट्रॅव्हल मार्टच्या माध्यमातून भारतातील अनेक टूर ऑपरेटर्स आपापल्या विभागात प्रेझेन्टेशन करणार आहेत. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनने यामध्ये सहभागी होण्याचे हॉटेल लँडमार्क येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. सात महिन्यांच्या लॉकडाउननंतर बंद असलेली हॉटेल्स आता काही प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायिकांची महत्त्वाची सभा झाली. देशासह जगभरातील पर्यटकांना रत्नागिरी जिल्ह्यात आकर्षित करण्याचा एक प्रयत्न म्हणून मुंबईतील ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यादृष्टीने संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरीतील स्थळदर्शनाचे माहितीपत्रक तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून हॉटेल व्यावसायिकांना आलेली सूचनापत्रे हा बैठकीतील आणखी एक प्रमुख विषय होता. या अनुषंगाने मंडळाच्या विभागीय अधिकारी श्रीमती गायकवाड यांना बैठकीत बोलाविण्यात आले होते. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने प्रदूषण मंडळाची भूमिका आणि हॉटेल व्यवसाय तसेच त्याकरिता करण्याचे सहकार्य याविषयी माहिती दिली. प्रदूषण मंडळाचे नियम, त्याअनुषंगाने घ्यायचे काळजी याची माहिती त्यांनी विस्ताराने दिली. यावेळी सदस्यांना अर्ज देण्यात आले आणि ते भरून ऑनलाइन पद्धतीने ऑफिसला पाठवण्याची सूचना करण्यात आली.

कोल्हापूर येथील अॅडव्होकेट वझे यांनी कामगार कायद्याविषयी मार्गदर्शन केले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी सांगितले की, हॉटेल व्यावसायिकांची संघटना उत्तमरीत्या कार्य करत असून सर्व हॉटेल व्यावसायिकांना त्याचा निश्चितपणे फायदा होत आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या विविध मार्गदर्शन शिबिरांचा आढावा घेऊन श्री. कीर यांनी संघटनेवर सर्वांनी पूर्णपणे विश्वास ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अनेक तरुण हॉटेल व्यावसायिक संघटनेत सहभागी होऊन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे सर्वांनी संघटनेला सहकार्य करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. आणखी एक नवीन संघटना तयार होत असल्याची माहिती मिळाली असून तिला शुभेच्छा देतो. विविध स्तरावर अशा संघटना होणे आणि संघटन मजबूत होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

अनेक व्यावसायिकांनी आपली मते यावेळी मांडली आणि शंकानिरसन करून घेतले. बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सचिव सुनील (अप्पा) देसाई यांनी केले. बैठकीला उपाध्यक्ष रवींद्र घोसाळकर, ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक बबनराव पटवर्धन तसेच गणपतीपुळे आणि रत्नागिरीतील बहुसंख्य हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply