स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यजमान रत्नागिरीचे सुयश

रत्नागिरी : पावस येथील स्वरूपानंद सेवा मंडळ आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय, गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. वरिष्ठ गटात यजमान गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि कनिष्ठ गटात देवरूखच्या आठल्ये-सप्रे महाविद्यालयाने सांघिक चषक पटकावला.

यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेचे ऑनलाइन पारितोषिक वितरण करण्यात आले. या समारंभाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रवचनकार धनंजय चितळे उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष विजयराव देसाई, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, मुख्य व्यवस्थापक जयंतराव देसाई, अमर देसाई आदी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी वरिष्ठ गटात २६ आणि कनिष्ठ गटात ३१ विद्यार्थ्यांनी व्हिडीओ पाठवले होते. वरिष्ठ गटासाठी डॉ. पांडुरंग कंद व सीए कल्याणी वैद्य-बोरकर, तर कनिष्ठ गटासाठी प्रा. गुरुराज गर्दे, मंजिरी पटवर्धन-तापस यांनी परीक्षण केले. स्पर्धेचे संयोजन प्रा.मानसी गानू, प्रा. आरती पोटफोडे आणि प्रा. अभिजित भिडे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. मकरंद दामले यांचे सहकार्य लाभले.

पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख वक्ते धनंजय चितळे यांनी अध्यात्म आणि वास्तव यांची यथार्थ सांगड उदाहरणासह आपल्या भाषणात मांडली. साधे सोपे दाखले देत अध्यात्मासारखा विषय त्यांनी सहजतेने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. निरीक्षण, वाचन आणि श्रवणावर विद्यार्थांनी भर द्यावा आणि स्वामींच्या साहित्याची खरी गरज आजच्या जगात आहे, म्हणूनच तरुणांनी स्वामींच्या साहित्याचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्पर्धेचा गुणानुक्रमे सविस्तर निकाल असा – वरिष्ठ गट- सांघिक चषक- गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. व्यक्तिगत विजेते – राधा सोहोनी (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय), आकांक्षा जावडेकर (एस. पी. कॉलेज, पुणे), शुभम पाटील (कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे), उत्तेजनार्थ – वर्षा काळे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय), उत्तेजनार्थ – अनिकेत पाळसे (रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी मुंबई)
कनिष्ठ गट- सांघिक चषक- आठल्ये-सप्रे महाविद्यालय, देवरूख. व्यक्तिगत विजेते – प्रांजल कुलकर्णी (एन. एस. गुळवे कॉलेज, शिरगोंडा), रिया पटवर्धन (नेली जोइडो आगियार हायर सेकंडरी कॉलेज), साक्षी वरक (आठल्ये-सप्रे- पित्रे कॉलेज, देवरूख). उत्तेजनार्थ – सानिया सावंत (कुडाळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कुडाळ), सिद्धेश नेवरेकर (टी. पी. ज्युनिअर कॉलेज, लांजा), श्वेता कुंभार (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply