महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण

रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण थाटात झाले.

महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखेतर्फे कथा, कविता आणि ललित लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील विजेत्यांना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या केळकर सेमिनार हॉलमध्ये गौरवण्यात आले. भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी निवृत्त शिक्षक विनायक हातखंबकर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, शाळेतल्या मुलांची पत्र लिहिण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी घरातील मुलांना आंतर्देशीय, पोस्टकार्ड लिहायला प्रोत्साहन द्यावे. ती आपली जबाबदारी आहे. करोना काळात माणूस माणसापासून लांब जाऊ लागला होता. पण माणसांनी एकत्र का राहिले पाहिजे, आपल्या प्रतिभेने लिखाण करून भावना का व्यक्त केल्या पाहिजेत, हे पुढच्या पिढीला सांगितले पाहिजे. लिहिण्याकरिता आधी भरपूर वाचले पाहिजे. तुम्ही वाचत राहा, ऐका, लिहीत राहा आणि त्याचे पुस्तकही प्रकाशित व्हावे, याकरिता प्रेरणा घ्या. सामाजिक समस्या, मुलींचे प्रश्न, शाळांमध्ये शिकणाऱ्या कमी वयाच्या मुलांचे प्रश्न, धार्मिक तेढ हे देशासमोरचे प्रश्न आहेत. जागतिकीकरणाचे काही विषय आहेत. यावर कथा, कविता लिहिता येतील. पुढील वेळ भेटताना आपण असे पुस्तक प्रकाशित केलेत तर आनंद होईल, असे श्री. हातखंबकर यांनी सांगितले.

यावेळी श्री. हातखंबकर आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सहकार्यवाह तथा रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. मसापचे अनिल दांडेकर यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले. काव्य स्पर्धेसाठी करोना काळ, कथालेखनासाठी करोना काळातील मानवी मनाच्या अवस्था तसेच ललित लेखनासाठी करोनाआधी आणि नंतरचे समाजजीवन असे विषय देण्यात आले होते. यातील प्रत्येक साहित्य प्रकारामध्ये पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे १०००, ८०० आणि ५०० रुपयांची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.

ललित लेखन स्पर्धेतील विजेत्या योगिनी भागवत, जान्हवी फडके, सानिका तळेकर, उल्लेखनीय पारितोषिक सौ. सविता बर्वे (सर्व रत्नागिरी) यांना गौरवण्यात आले. कथालेखन स्पर्धेत गुणानुक्रमे विस्मया कुळकर्णी (रत्नागिरी), रूपाली पाटील (खेड), राधा रायकर (चिपळूण) यांना बक्षिसे देण्यात आली. काव्य लेखन स्पर्धेत नीलिमा इंदुलकर (रत्नागिरी), रूपाली पाटील (खेड), विनायक जोशी (चिपळूण) यांनी यश मिळविले. यावेळी नाटककार जयंत पवार यांच्या दोन लघुकथांचे वाचन साक्षी चाळके, सई साने आणि अनिल दांडेकर यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply