स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती यावेळी मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. राज्य शासनाने प्रथमच त्यासाठी पुढाकार घेतला. वीरभूमी परिक्रमेचे आयोजन केले. शासनाच्या पर्यटन विभागाच्या आणि प्रामुख्याने पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कल्पनेतून या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते. सावरकरांचे जन्मगाव भगूर, नाशिक, पुणे, मुंबई, रत्नागिरी अशा सावरकरांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सावरकरांच्या विचारांचे मंथन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना राज्य शासनाने दिलेली ही मानवंदनाच होती.
रत्नागिरीत पार पडलेल्या सप्ताहात दुचाकी फेरी, पथनाट्य, कीर्तन, वक्तृत्व, रांगोळी, वाळूशिल्प, गीतांचे सादरीकरण, नृत्य, नाटक अशा विविध आविष्कारांमधून सावरकरांच्या आठवणी जागवल्या गेल्या. पण काही दिवसांसाठी अशा केवळ आठवणी जागवून काही होणार नाही. वर्षभर सावरकर जयंती साजरी केली पाहिजे, अशी अपेक्षा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली असली तरी ती अपेक्षा आणि त्यानिमित्ताने व्यक्त केलेले विचार प्रासंगिकच ठरतात. अगदी दुसऱ्या दिवशीही त्यात कोणतीच प्रगती होत नाही. जयंती आणि पुण्यतिथी एवढ्यापुरतेच ते प्रसंग मर्यादित राहतात. पण सावरकरांचे विचार त्यापलीकडचे आहेत. सावरकर विचार जागरण सप्ताहाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा प्रतीत झाले आहे. त्यांच्याविषयी अपप्रचार केल्या जात असलेल्या काळात हे ठळकपणे जाणवले. अलीकडे सामाजिक समरसता आणि हिंदुत्व याबाबत अत्यंत टोकाची मते तयार झाली आहेत. ही टोके विचारांनीच बोथट करता येऊ शकतील. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी सावरकरांचा उल्लेख शतपैलू सावरकर असा केला होता. त्यांच्या या सर्व पैलूंचे संशोधन आणि अभ्यास तसेच प्रामुख्याने त्यांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी सावरकर विद्यापीठ स्थापन व्हायला हवे.
सावरकरांचे वास्तव्य रत्नागिरीत होते. त्याच काळात सामाजिक समरसता आणि हिंदुत्वाबाबतचे त्यांचे विचार प्रखरतेने प्रकट झाले होते. त्यांच्या कल्पनेतून दानशूर भागोजीशेठ कीर यांनी उभारलेल्या पतितपावन मंदिराच्या रूपाने सामाजिक समरसतेचे देशातील पहिले प्रतीक रत्नागिरीत उभारले गेले आहे. त्याच भूमीत सावरकर विद्यापीठाची निर्मिती व्हायला हवी. केवळ अभ्यासापेक्षाही सध्याच्या आणि पुढील काळात जाती-जातीमधील विद्वेष दूर करणे आणि खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता साधणे जरुरीचे असल्यामुळे तसे विचार या विद्यापीठातून पेरले जायला हवेत. प्रत्येकच जात आता अभिनिवेश बाळगू लागली आहे. अमृतमहोत्सवी भारतीय लोकशाही परिपक्व होण्याच्या काळात ही अपरिपक्वता प्रकट होत आहे. वेगाने फोफावत आहे. ती ठेचण्यासाठी सावरकरांनी मांडलेल्या विचारांचा अभ्यास आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. परस्परविरोधी दोन टोके गाठली जात असल्याने वैचारिक विषमता निर्माण झाली आहे. हिंदुत्व या शब्दामध्ये अभिप्रेत असलेला खरा अर्थ याबाबतीतही तेच झाले आहे. शांतता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. त्या जोरावर विश्वगुरू होण्याचे भारताचे स्वप्न आहे. ते प्रत्यक्षात यायचे असेल, तेव्हा येऊ दे. पण त्यासाठी अत्यावश्यक असलेली शांतता पुन्हा एकदा प्रस्थापित व्हायला हवी. अशांतता नष्ट व्हायला हवी. अन्य कोणत्याही समस्यांपेक्षा ही अशांतता हेच खरे तर भारतापुढचे सर्वांत मोठे आव्हान आहे. ते पेलण्याचे धडे सावरकर विद्यापीठातून दिले जाऊ शकतील. रत्नागिरीतील पतितपावन मंदिर संस्थेने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मुंबईतील सावरकर राष्ट्रीय स्मारकासह अनेक संस्था, विविध संघटना त्यासाठी निरपेक्ष मदत करू शकतील. देशातील गोंधळलेल्या सामाजिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी या विद्यापीठाचा उपयोग होऊ शकेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २ जून २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – २ जून २०२३ रोजीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia2june
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : सावरकर विद्यापीठाची गरज
https://kokanmedia.in/2023/06/02/skmeditorial2june/
मुखपृष्ठकथा : सावरकरांच्या विचारांचा कर्मभूमीत जागर : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४०व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत सावरकर विचार जागरण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्याअंतर्गत झालेल्या कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

