सावंतवाडी : माजगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध भजनी बुवा विजय गोपाळ माधव यांना पुण्यातील आर्ट बीट्स संस्थेचा २०२२-२३चा राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. विजय माधव गेली ३३ वर्षे माजगाव म्हालटकरवाड्यातील श्री जयशंभो भजन मंडळामार्फत सेवा करत आहेत. त्यांना आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित भजन स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळाली असून, उत्कृष्ट हार्मोनियमवादक, गायक असे सन्मानही प्राप्त झाले आहेत.
त्यांचे तबल्याचे उपांत्य विशारदपर्यंतचे शिक्षण प्रमोद मुंड्ये यांच्याकडे झाले. नंतर गुरुदास मुंड्ये यांच्याकडे त्यांनी हार्मोनियम वादन प्रवेशिकापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर ते सिंधुदुर्गातील भजनरत्न भालचंद्रबुवा केळुसकर (मालवण) यांच्याकडे भजन कलेचे पुढील शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे विजय माधव गेली अनेक वर्षे नव्या विद्यार्थ्यांना तबला, हार्मोनियम आणि भजन कला शिकवत आहेत. बऱ्याच भजन मंडळांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.
कला सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगीतप्रेमी एच. बी. सावंत सर, भालचंद्रबुवा केळुसकर, पखवाज विशारद संकेत म्हापणकर, तबलावादक विक्रम कासार, तसेच सर्व विद्यार्थिवर्गाने आणि जयशंभो भजन मंडळाने विजय माधव यांचे अभिनंदन केले आणि संगीत क्षेत्रातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

