ओव्यांच्या साथीने गोमंतकीय मराठी कवितांची लांज्यात बरसात

लांजा : ओव्यांच्या साथीने जात्यावर दळण दळले जात होते आणि त्यातून जणू गोमंतकीय कवितांचे पीठ पडत होते.‌ जोडीला नैसर्गिक पाऊसही अधूनमधून बरसत होता. या अनोख्या समारोहात लांज्याचे रसिक न्हाऊन निघाले.

लांजा येथील माऊली सभागृहात गोमंतकीय लोकवाङ्मय आणि कवितेचे मनोज्ञ दर्शन घडविणा-या “गंध मातीचा… छंद कवितेचा” या गोव्यातील नामवंत कवींचा कार्यक्रम साहित्यरसिकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांजा शाखा आणि लोकमान्य वाचनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ विलास कुवळेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, मुचकुंदीच्या भेटी मांडवी आलीसे। काळीज उसासे घेवोनीया।। असा आजचा कार्यक्रम आहे. लांजा असो वा गोवा, मानवी जीवन, भावभावना सर्वत्र तशाच आहेत. फरक असेल तर तो थोडाफार तपशिलाचा. गोमंतकीय भूमीच्या प्राकृतिक सौंदर्याइतकाच इथल्या लोकवाङ्मयीन संस्कृतीचा गंध, कवितेची अमीट गोडी रसाळ, गोमटी या कार्यक्रमातून मुचकुंदीच्या भेटीला साक्षात मांडवी भेटायला आली आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर गोव्यातील प्रसिद्ध कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या चित्राताई क्षीरसागर, लांज्याच्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, कार्यवाह विजय खवळे, लोकमान्य वाचनालयाचे उपाध्यक्ष योगेश वाघधरे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या लांजा शाखेचे अध्यक्ष किरण बेर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

गोव्याच्या भूमीत इंग्रजी आणि कोकणी भाषेचे प्रभुत्व असतानाही मायमराठीची सेवा करतानाच तिची थोरवी गाण्यासाठी आयोजिलेल्या ‘गंध मातीचा छंद कवितेचा’ या कार्यक्रमातून गोमंतकीय भूमीतील लोकसाहित्याच्या प्रसिद्ध अभ्यासिका पौर्णिमा केरकर, गझलकार प्रकाश क्षीरसागर-,सामाजिक कार्यकर्त्या -कवयित्री चित्रा क्षीरसागर, गोव्यातील साहित्य विश्वात आपल्या साहित्यकृतींनी मुद्रा उमटविणाऱ्या दीपा मिरींगकर, आसावरी कुलकर्णी, शुभदा च्यारी, रजनी रायकर आणि विठ्ठल शेळके या प्रामुख्याने मराठी भाषेत लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी एकापेक्षा एक सरस, सकस कवितांचे वाचन केले. त्यातून गोमंतभूमीतील लोकजीवन, स्त्रीजीवन, निसर्ग आणि संस्कृती यांचे सप्तरंग उलगडून दाखविले. काव्यवाचनाच्या नेहमीच्या प्रथेपेक्षा अत्यंत वेगळेपणाने हा कार्यक्रम पार पडला. जोडीला जात्यवरच्या ओव्या, काही कवितांना जात्याचेच तर काही कवितांना तालवाद्य, झांजांचे पार्श्वसंगीत अशी ही मैफल होती. बहुतेक कवींना इतर कवींच्या कविताही तोंडपाठ होत्या. कवी आपली कविता सादर करताना बाकीचे कवीही त्या कवीला कविता तालासुरात म्हणून साथ देत होते. खऱ्या अर्थाने कवी आणि कवितांच्या भावबंधांचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाला लांज्यातील रसिकांनीही तितकीच मनमुराद दाद दिली.

काव्यवाचनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात चित्रा क्षीररसागर यांनी सादर केलेली स्वत:च्या आतल्या झऱ्याचा शोध घेताहेत पोरी ही कविता एकविसाव्या शतकातील नव्या आत्मनिर्भर स्त्रीशक्तीचा प्रत्यय करून देणारी ठरली. लोकवाङ्मयाच्या अभ्यासिका पौर्णिमा केरकर यांनी सादर केलेल्या ‘बापांनी पुरविले’ या कवितेतून बाप-मुलीच्या नात्यातील ह्दयस्पर्शी नातेसंबधांवर भाष्य केले.’असे असावे जीवन माझे आयुष्यात एकदा फुलावे’ ही सात वर्षांतून एकदा कोकणातील कातळसड्यांवर उगवणाऱ्या कारवी या वनस्पतीचे जीवनगाणे गाणारी आसावरी कुलकर्णींची कविता, आज भूमी श्रावणाने धुंद झाली कोंब येता पावसाने धुंद झाली ही प्रकाश क्षीरसागरांची गझल, रजनी रायकर यांनी इकडे तिकडे चोहीकडे तर दीपा मिरींगकर यांनी भुईचाफा या कवितांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विठ्ठल शेळके आणि शुभदा च्यारी या द्वयीच्या आशयघन आणि ओघवत्या निवेदनाने उपस्थित श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यासारख्या छोटेखानी शहरात गोमंतभूमीतील मराठी आणि कोकणी भाषेत लेखन करणारे तब्बल आठ कवी एकाच मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मसापच्या विजयालक्ष्मी देवगोजी, विजय हटकर, महेंद्र साळवी, लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, योगेश वाघधरे, उमेश केसरकर, रामचंद्र लांजेकर यांनी विशेष मेहनत घेतली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निवेदन विजय हटकर यांनी केले, तर आभार उमेश केसरकर यांनी मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply