रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी आनंद शेलार यांची निवड झाली आहे.

कोकण विभागातील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्याकडून विविधांगी साहित्य लेखन व्हावे, या हेतूने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. या संस्थेवर श्री. शेलार यांची निवड करण्यात आली असून केंद्रीय अध्यक्ष सौ. नमिता कीर आणि केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे ही माहिती दिली.
मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी निरीक्षक म्हणून गजानन कमलाकर पाटील यांनी काम पाहिले. यावेळी विश्वस्त अरुण नेरूरकर, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, दादा कदम, राजेश गोसावी, युयुत्सु आर्ते, पत्रकार प्रमोद हर्डीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. शेलार पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरात गेली ३७ वर्षे अध्यापन करत असून प्रशालेतील विविध शैक्षणिक उपक्रमांबरोबरच त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. ते विविध संघटनांवर कार्यरत असून पावस ग्रामपंचायतीत तंटामुक्ती गाव समितीचे सदस्य म्हणून ते काम करत आहेत. रत्नागिरीतील पहिल्या रत्नागिरी दर्शन या पुस्तकाचे संपादन आणि प्रकाशन त्यांनी त्यांनी सुदेश बेर्डे यांच्यासोबत केले असून अनेक वृत्तपत्रांमधून प्रासंगिक लेखन केले आहे.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, विश्वस्त रमेश कीर, रेखाताई नार्वेकर, केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्यवाह माधव अंकलगे, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी आणि इतर कार्यकारिणी सदस्यांनी श्री. शेलार यांचे अभिनंदन केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

