शामराव पेजे स्मृती न्यासातर्फे माचाळला आंबा कलमांचे वाटप

लांजा : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यासातर्फे माचाळ (ता. लांजा) येथे केशर आणि रत्ना या आंबाकलमांचे वाटप करण्यात आले.

लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यासाच्या सामाजिक आणि शैक्षणिक ध्येयानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. लांजा तालुक्यातील सह्याद़ीच्या माथ्यावरील अतिदुर्गम असलेल्या आणि जिल्ह्यातील पहिले ‘ब’ वर्ग हिल स्टेशन म्हणून नावलौकिक मिळवलेल्या माचाळ गावात महिला, ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आंबाकलमांचे वाटप करण्यात आले.

यावेळी न्यासाचे सदस्य जी. बी. चाळके यांनी कलम लागवडीचे उद्देश आणि लागवडीसंबंधाने घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत माहिती दिली. न्यासाचे पदाधिकारी गणेश जोशी यांनी लोकनेते पेजे यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतला. न्यासाचे अध्यक्ष अॅड. सुजित झिमण यांनी सांगितले की, पेजे साहेबांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीतून सर्वसामान्य जनतेसाठी मी प्रयत्नशील आहे. त्यांचा आदर्श आणि स्मृती भावी पिढीसाठी प्रेरणादायक आहेत. यापुढेही न्यास विविध मार्गांनी आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यानंतर माचाळ मुचकुंदी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि शामराव पेजे स्मृती न्यासाचे विश्वस्त विवेक सावंत यांनी स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षात पेजे साहेबांच्या नावाने असलेल्या न्यासाने दुर्गम भागात अगत्याने भेट दिल्याबद्दल तसेच ग्रामीण भागात न्यासाचे कार्य पोहोचविण्याच्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला. यापुढेही विविध मार्गांनी विविध स्तरावर मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेतर्फे अंगणवाडी आणि शाळेतील मुलांना शैक्षणिक, क्रीडा साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. माचाळ पर्यटन संस्थेच्या संयोजनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास गावकर पांडू पाटील, तुकाराम पाटील, गणू मांडवकर यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. समारंभाला अशोक पवार, गावकर पांडू पाटील, स्थानिक शाळा समितीचे विजय पाटील, अंगणवाडीच्या रिया पाटील, महिला, ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply