रत्नागिरी : रत्नागिरीतील लायन्स क्लब, दैवज्ञ हितवर्धक समाज आणि निरामय योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मोफत योग शिबिराचे आयोजन येत्या शनिवारी (दि. १९ ऑगस्ट) करण्यात आले आहे.
दैवज्ञ भवन सभागृहात शनिवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत हे योग शिबिर होईल. सर्वांसाठी मोफत असलेल्या या शिबिरामध्ये पतंजली योगपीठाचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ज्येष्ठ योगगुरू वीरू स्वामी योग आणि प्राणायामाबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत.
यामध्ये रोगानुसार योगमार्गदर्शन, फिजिओथेरपी आणि ॲक्युप्रेशर मार्गदर्शनही केले जाणार आहे. कंबरदुखी, गुडघेदुखी, रक्तदाब, शुगर, थायरॉइड, स्त्रियांचे आजार अशा अनेक रोगांचा समावेश आहे. एक ते दोन किलो वजन अवघ्या दोन तासांत कमी होणार आहे. त्यासाठी योगापूर्वी आणि योगानंतर वजन तपासून त्याची खात्री करून दिली जाणार आहे.
शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीने स्वतःकरिता योगा मॅट किंवा सतरंजी, पाणी, नॅपकिन सोबत आणावे. शिबिरामध्ये सहभागी होताना शक्यतो सैल सुती कपडे घालावे. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीने नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर हजर राहावे. तसेच ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल, अशा व्यक्तींनी १५ मिनिटे अगोदर हजर राहावे आणि योगशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

