संपर्क संस्थेचा स्वातंत्र्यदिन मतिमंद मुलांसोबत

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिन सोहळा मतिमंद मुलांसोबत साजरा करून संपर्क युनिक फाउंडेशनने आगळावेगळा उपक्रम राबविला.

देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना समाजातील दिव्यांगांसारखे काही घटक या उत्साहाला मुकतात. तेच लक्षात घेऊन संपर्क युनिक फाउंडेशनने ७६ वा स्वातंत्र्यदिन सोहळा दिव्यांग मुलांसोबत साजरा करून समाजात आपले वेगळेपण जपले.

सर्वसामान्य मुले आपल्या पालकांना अशा या दिवशी अनेक हट्ट पुरविण्यास सांगतात. पालकही अशा आनंदी वातावरणात त्या पूर्ण करतात. मात्र समाजात अशीही काही मुले असतात, त्यांना असा हट्ट करता येत नाही. मनात असूनही हा आनंद उपभोगता येत नाही. हीच गोष्ट मनात ठेवून संपर्क युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी आपल्या सर्व टीमला रत्नागिरी शहरातील आशादीप या दिव्यांग मतिमंद मुलांच्या केंद्रात नेले.

या मुलांसोबत सर्वजण बोलू लागले. मुलांसमोर देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले, त्यावेळी या मुलांच्या मनातील देशाभिमान जागृत झाला आणि ही मुलेही देहभान विसरून नाचू लागली. काही मुलांनी आपापल्या परीने भाषणेही केली. मुलांना खाऊ देण्यात आला.

यावेळी शकील गवाणकर यांच्यासमवेत संस्थेचे कांचन मालगुंडकर, युसुफ शिरगावकर, नाझीम मजगावकर, जमीर खलफे, जया डावर, निकिता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारचा आगळावेगळा उपक्रम संस्थेने आपल्या संस्थेतील मुलांकरिता राबविल्याबद्दल आशादीपचे दिलीप रेडकर यांनी समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply