Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

तासभर स्वच्छता, बाकी आनंदच!

Advertisements

केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एक तारीख एक तास स्वच्छता ही सेवा हा उपक्रम देशभरात राबविण्यात आला. या पंधरवड्याची पूर्वतयारी म्हणून रत्नागिरीत जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविले गेले. प्रत्येक कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण या मोहिमेत सहभागी झाले. त्यातून टनावारी कचरा संकलित करण्यात आला. त्याचे पुढे काय झाले, हा प्रश्न कोणालाच पडण्याची शक्यता नाही. पण त्यापेक्षाही एक महत्त्वाचा प्रश्न पडतो तो एवढा कचरा तयारच कसा झाला हा.

शासकीय कार्यालये नागरिकांसाठी आदर्श असली पाहिजेत. जनतेसाठी असलेल्या कोणत्याही सोयीसुविधा आधी या कार्यालयांमध्ये सुरू झाल्या पाहिजेत. रूफ वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी साठविणे, प्लास्टिक आणि अन्य कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट करणे, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, घरांच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती आणि त्याचे महावितरणच्या ग्रीडमधील वितरण, शोषखड्डे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा अशा कितीतरी योजना शासनातर्फे जाहीर केल्या जातात. त्याची अंमलबजावणी शासकीय कार्यालयांमार्फत होते, पण पूर्वीच्या काळातील रॉकेलच्या किंवा मेणबत्तीच्या दिव्याखाली अंधार असावा, तशी स्थिती शासकीय कार्यालयांमध्ये असते. डास निर्मूलनासाठी जनजागृती करणाऱ्या मलेरियाच्या कार्यालयातच डासांमुळे लोकांना बसवेनासे होते. रुग्णालयामधील औषधांपेक्षाही सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाकातोंडावर रुमाल घेऊन फिरावे लागते. असे प्रत्येक कार्यालयाचे उदाहरण देता येईल. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा छोटा प्रकल्प प्रत्येक ग्रामपंचायतीने उभारायला काय हरकत आहे? गावातील लोक येताजाताना तो पाहू शकतील आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या घरी तसा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करतील. याच पद्धतीने प्रत्येक कार्यालयाने निदान आपल्या खात्याशी संबंधित असलेल्या योजना आपल्या कार्यालयामध्ये राबविल्या, तर कितीतरी प्रमाणात जनजागृती होऊ शकेल आणि वेगळ्या जनजागृतीची गरज पडणार नाही.

एक तारीख एक तास स्वच्छता मोहिमेचेही इतर मोहिमांप्रमाणेच झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसारख्या प्रमुख अधिकाऱ्यालाही आपल्या कार्यालयाच्या आवारात स्वच्छता करण्यासाठी झाडू घेऊन फिरावे लागत असेल, तर या कार्यालयासाठी असलेली स्वच्छता कामगारांची व्यवस्था नेहमी काय करते, हा प्रश्न पडतो. मध्यंतरी रत्नागिरीतील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहांची स्वच्छता केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि तातडीने सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन स्वच्छतेविषयीच्या सूचना दिल्या. त्याला फार तर महिनाभर लोटला असेल. त्यावेळी केलेल्या त्या सूचनांचा कोणताही सकारात्मक परिणाम झालेलाच नव्हता, हे एक दिवस एक तास अभियानाच्या निमित्ताने स्पष्ट झाले. एखाद्या प्रतीकात्मक आंदोलनाची दखल घेऊन तातडीने बैठका घेणे, सूचना देणे हे नेहमीच घडत असते. स्वच्छतेच्या बाबतीतही तेच झाले आहे. आधीच्या सूचना वाऱ्यावरच विरत असतील किंवा बहुधा याच अभियानादरम्यान कोसळलेल्या पावसात वाहून गेल्या असतील. त्यामुळेच प्रत्येक कार्यालयातील प्रमुखांसह सर्व कर्मचाऱ्यांना हाती झाडू घेण्याची वेळ आली. एवढा कचरा त्या त्या कार्यालयांमध्ये आणि परिसरात साठला, याचा अर्थ नियमित स्वच्छता केलीच जात नव्हती. मग त्यासाठी नियुक्त केलेले कर्मचारी आणि स्वच्छतेची सारी यंत्रणा नेमके काय करत होती? गांधी जयंतीच्या निमित्ताने आणि वर्षभर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या विशेष दिवशी स्वच्छता अभियान राबविले जाते. त्यासाठीच हा कचरा साठवून ठेवला जात असतो का, असाही प्रश्न मनात डोकावतो. अभियानापुरती स्वच्छता केली जाते. त्यानंतर सारा आनंदीआनंदच असतो, असाच त्याचा अर्थ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version