“कचरा वाढला, तर कुठे फिरणार?“ मुलाच्या प्रश्नाने उभी राहिली कचरादान चळवळ

महाड (सुनील पाटकर) : कचरा असा वाढला, तर आपण कुठे फिरणार? या लहान मुलाच्या प्रश्नाने महाडमध्ये एका महिलेने कचरादानाची चळवळ उभी केली आणि ती आता रायगड जिल्ह्यात सर्वत्र पसरली आहे.

स्वतःच्या घरापासून स्वच्छता आणि कचरा विल्हेवाटीची सुरुवात करणाऱ्या महाडमधील या महिलेने शून्य कचरा आणि कचरादान ही संकल्पना समाजात रुजवली. सुमारे बारा वर्षांपूर्वी एका शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या ममता मेहता यांनी समाजाला ही दिशा दाखवली आहे. आज एकेक करत त्यांच्यासोबत सुमारे अडीचशे महिला या कामाला झोकून देत आहेत.

महाडमध्ये राहणाऱ्या ममता मेहता आपला मुलगा लहान असताना त्याला सावित्री नदीकिनारी फिरायला घेऊन जात असत. परंतु हळूहळू नदीच्या किनारी कचऱ्याचे ढीग जमू लागले आणि आई, कचरा असा वाढला, तर आपण कुठे फिरणार? असा प्रश्न त्यांच्या मुलाने केला. हाच प्रश्न समाजामध्ये आज मोठी समस्या बनून उभा आहे. अनेक शहरांमध्ये निर्माण झालेले कचऱ्याचे ढीग आणि कचरा निर्मूलन ही मोठी जटील समस्या आहेच. त्याचे निराकरण करण्याचे काम ममता मेहता यांनी केले.

खान्देशातून विवाह करून महाडमध्ये आलेल्या ममता मेहता यांना पाण्याचे महत्त्व कळत होते. नदीकिनारी कचऱ्याचे ढीग पाहून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्यातूनच त्यांनी स्वतःच्या घरापासून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे धोरण स्वीकारले. आपल्या घराच्या परिसरामध्ये खड्ड्यामध्ये कचरा साठवणे, कचऱ्याचे सुका आणि ओला वर्गीकरण करून या कचऱ्याची विल्हेवाट लावणे असे काम त्या करू लागल्या. हळूहळू त्या राहत असलेल्या प्रभात कॉलनीमध्ये अनेक महिला त्यांचे अनुकरण करू लागल्या. त्यावेळी महाडमध्ये डम्पिंग ग्राउंड, घंटागाडी नव्हत्या. कचरा विल्हेवाटीच्या योग्य सोयीसुविधाही नव्हत्या. काही वर्षे त्यांचे हे काम असेच सुरू होते.

त्यांच्या कामाला २०१३ पासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. प्रभात कॉलनीतील प्रभात महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष झाल्या आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या कॉलनीमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. हळूहळू सोशल मीडियावर त्यांचे काम पसरू लागले. फक्त कचरा याच विषयावरचा ग्रुप तयार झाला आणि त्यातूनच समविचारी माणसे जोडली गेली. प्रभात कॉलनीमध्ये स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले. अभियानामध्ये सर्व नागरिक, व्यापारी डॉक्टर्स, सुशिक्षित वर्गही सहभागी झाला. या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात कचरा जमा करण्यात आला आणि त्याची विल्हेवाट लावण्यात आली. असे अभियान अधूनमधून प्रभात कॉलनी आणि महाड शहरातील इतर भागातही घेण्यात येऊ लागले. कचऱ्यात लो वेस्ट प्लास्टिकची समस्या ही मोठी होती. ते प्लास्टिक जमवून ते स्वतः पुण्याला पाठवण्याचे काम ममता मेहता आणि इतर महिला करत असत.

केंद्र सरकारने स्वच्छता कार्यक्रमावर विशेष भर दिल्यानंतर ममता मेहता यांच्या कामाला मूर्त स्वरूप येऊ लागले. रुद्र फाउंडेशनच्या माध्यमातून लो वेस्ट प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होण्याचा मार्ग सुलभ झाला. त्याच दरम्यान त्यांचा संपर्क खारघर येथील शृंखला या संस्थेशी आला आणि त्यांनी महाड येथे शृंखलाची शाखा तयार केली. आज महाडमधील सर्व स्वच्छता अभियानाची कामे शृंखलाच्या मार्फत केली जात आहेत. सार्वजनिक स्वच्छता आणि शून्य कचरा तसेच कचरादान हे कार्यक्रम महाड, माणगाव, बिरवाडी, एमआयडीसी, गोरेगाव, पोलादपूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वेगवेगळ्या भागातून प्लास्टिक, चिंध्या इत्यादी कचरा, चपला, काचा अशा प्रकारचा कचरा शृंखलाच्या माध्यमातून जमा केला जातो. लोकांकडून अशा कचऱ्यांचे दान मागितले जाते. त्यानंतर हा कचरा प्रक्रियेसाठी एका संस्थेकडे पाठवला जातो.

ममता मेहता यांच्यासह अनेक महिला कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता स्वखर्चाने ही मोहीम राबवत असतात. पाण्याचे स्रोत स्वच्छ राहावेत, कचरादान, कचऱ्याचे विघटन, कचऱ्याबाबत जनजागृती अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. गावागावांमध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ममता मेहता मार्गदर्शन करत असतात. शून्य कचरा आणि कचरादानाची चळवळ दक्षिण रायगडमध्ये पसरू लागली आहे. महाडपासून पनवेल पर्यंतची सर्व गावे कचरा दान चळवळीमध्ये आणण्याचा ममता मेहता यांचा मनोदय आहे. या सर्वांनी एका ठिकाणी कचरा गोळा केल्यास तो जमा करून प्रक्रिया पाठवण्याची त्यांची तयारी आहे. यासाठी समाजात काम करणाऱ्या विविध महिला आणि स्वयंसेवकांनी पुढे येण्याची गरज आहे.
(संपर्कासाठी : ममता मेहता – 9096229782)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply