स्मरण डॉ. चारुशीला गुप्ते यांचे

जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा झाला. पण त्यानिमित्ताने सुमारे ४९ वर्षांपूर्वीचा प्रा. चारुशीला गुप्ते यांच्याविषयीचा एक प्रसंग आठवला.

मी तेव्हा मुंबईतील जयहिंद कॉलेजमध्ये शिकत होतो. प्रा. डॉ. चारुशीला गुप्ते मॅडम तेथील मराठी भाषा विभागप्रमुख होत्या. पद्य शिकवत असताना एका कवितेचे रसग्रहण तपासण्यासाठी म्हणून त्यांनी माझी वही चाळली. वहीत माझी स्वरचित कविता लिहिलेली त्यांनी पाहिली. त्यांनी वाचली. ती त्यांना आवडली. माझे सादरीकरण ऐकून आकाशवाणीच्या काव्यगायनासाठी त्यांनी लगेच माझी निवड केली.

त्यावेळी देशभर आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे खूपच प्रभावी माध्यम होते. मॅडमनी माझ्या वहीतून ६ कवितांची निवड केली. त्यांनी स्वतः लिहून दिलेले रेकमंडेशन लेटर घेऊन मी जवळच चर्चगेट येथील आकाशवाणी भवनात पोहोचलो. तेथे एक उत्तर भारतीय व्यक्ती रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत होती. त्यांना पत्र दिले. प्रत्येक कविता कागदाच्या एकाच बाजूस नीट समास सोडून सुवाच्य अक्षरात लिहून दिल्या. प्रत्येक कवितेच्या खाली नाव, स्वाक्षरी, शिकत असलेल्या कॉलेजचे नाव, आय-कार्डवरील लिखित माहिती दिली. दोन तासांत सहा कविता माझ्याकडून त्यांनी म्हणून घेतल्या आणि त्या रेकॉर्डिस्टने कविता माझ्या स्वरात ध्वनिफितीत मुद्रितही करून घेतल्या. त्यातले तांत्रिक ज्ञान मला त्यावेळी विशेष नव्हते. कदाचित आजही त्यातले विशेष काही कळते, असे नाही. रेकॉर्डिंग झाल्यानंतर मला मिळालेला चेक घेऊन मी घरी निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी गुप्ते मॅडम यांना भेटण्यासाठी म्हणून कॉमन रूममध्ये गेलो. भारदस्त व्यक्तिमत्त्व लाभलेल्या मॅडमना संपूर्ण टीचिंग स्टाफमध्ये खूप आदर होता. एका नोटबुकमध्ये जपून ठेवलेला तो चेक मॅडमच्या हाती दिला. चष्मा ठीक करत त्यांनी त्या चेकचे निरीक्षण केले. चेक आकाशवाणीने माझ्या नावे दिला होता. त्यातील मानधनाची रक्कम ३० रुपये लिहिली होती. (आजच्या पिढीला ‘तीस रुपये’ ही रक्कम (!) वाचताना अडखळल्यासारखे होऊ शकते.)

तो चेक मी कॉलेजच्या कार्यालयात जमा करायला हवा, अशी माझी समजूत झाली. तसे मॅडमना विचारताच त्या जोरजोरात हसल्या. तो चेक पुन्हा पाकिटात भरून परत माझ्याकडे देऊन त्या म्हणाल्या, “हे मानधन सरकारकडून तुला देण्यात आलय. फोर्ट मार्केटमध्ये जा. तिथल्या आरबीआयच्या पब्लिक काऊंटरवर सही करून त्यांना दे. तिथला कॅशियर तुला तीस रुपये रोख देईल. आणि हो, आय-कार्ड दाखवायला विसरू नकोस.”

त्यांचे ते बोल ऐकून मन भारावून गेले. मॅडम खरेच मोठ्या मनाच्या ठरल्या. संकुचित हा शब्द त्यांना माहीत नसावा. जात-धर्माचे कवच झुगारून माय मराठीची निस्सीम सेवा त्यांनी केली. विद्यार्थी घडवले. समाजात त्यांना लोक सन्मानित दृष्टीने पाहत असत. त्यांनी माझ्यावर खूप उपकार केले. स्वतःचा विश्वास दाखवला. कुचेष्टा न करता मला त्यावेळी उत्स्फूर्तपणे शाब्दिक आधार दिला, सादरीकरण करताना ज्या उणिवा जाणवल्या, त्यात सुधारणा केली. पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवला. एवढेच नव्हे, तर मी लिहिलेल्या त्या सहा मराठी कवितांमधून एक कविता कॉलेजच्या वार्षिक अंकात प्रसिद्ध केली! त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला नसता तर कदाचित स्वतःच्या न्यूनगंडात मी गुरफटून पुढे आलोच नसतो.

मी आजीवन त्यांच्या ऋणात होतो, आहे. त्यांची री ओढून त्यानंतर मीदेखील काहींना लेखणीच्या माध्यमातून मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. आजही करत आहे.

त्यावेळी मिळालेली ती ‘रक्कम’ एक रुपया वटणावळ सोडून २९ रुपये चांदीची चिल्लर घेऊन घरी आईकडे नेऊन दिली. तिच्याच सांगण्यावरून त्याच वर्षी माझ्या थोरल्या बहिणीच्या लग्नात भावाकडून २९ रुपयांचा आहेर दिला! त्यावेळी मात्र अश्रू अनावर झाले! तो भावनिक ओलावा आजही जाणवत आहे.

चार दिवसांनंतर आकाशवाणीच्या युववणी ब या केंद्रावरून माझ्या त्या रेकॉर्डेड कविता प्रसारित झाल्या. घरच्यांनी, पदमसी वाडी (माझगाव) येथील रहिवाशांनी तसेच कॉलेजात सेवादलातील मित्रमैत्रिणींसमवेत तो कार्यक्रम मी स्वतः ऐकला. एन्जॉय केला.

याचे श्रेय त्यावेळच्या माझ्या गुरू प्रा. चारुशीला गुप्ते यांनाच जाते.

दोन वर्षांपूर्वी मुंबईतील चर्नी रोड येथील सैफी हॉस्पिटलमध्ये जात असताना रस्ता ओलांडताना रस्त्यालगत निळ्या रंगाचा एक फलक वाचला आणि पुनःपुन्हा वाचत राहिलो, त्या फलकावर लिहिले होते प्रा. चारुशीला गुप्ते मार्ग!! त्या फलकास स्पर्श केला. मॅडमचा आशीर्वाद घेतला.

माझ्या आजवरच्या साहित्यिक जडणघडणीत मॅडमनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांना नमन करतो. आज पुन्हा इतक्या वर्षांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने मिनिटभराचे व्हिडीओ शूटिंग करायचा प्रसंग आला, तेव्हा तेव्हाच्या साऱ्या प्रसंगाची आठवण झाली. आमच्या मॅडमच्या आठवणींनी ४९ वर्षांपूर्वीचा तो काळ समोर येऊन उभा राहिला. साहित्य क्षेत्रात खरेच आज गरज आहे, ती गुप्ते मॅडमसारख्या निस्सीम व्यक्तीची! ज्यांनी मोठ्या मनाने मला लिहिता केले, त्यावेळच्या रेडिओसारख्या जागृत माध्यमातून प्रसिद्धी मिळवून दिली. ओळख मिळवून दिली. धन्यवाद मॅडम!

  • इक्बाल शर्फ मुकादम
    दापोली
    (संपर्क – 9920694112)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply