एक किलोमीटर रस्त्याची स्वच्छता करून ज्येष्ठ नागरिकाचा आदर्श

सावंतवाडी : एक रविवार एक किलोमीटर स्वच्छता या संकल्पनेतून येथील डॉ. मधुकर घारपुरे यांनी राबविलेल्या स्वैच्छिक स्वच्छता अभियानातून प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या आणि नागरिकांसाठी नागरी स्वच्छतेचा एक वेगळा आदर्श घालून दिला.

डॉ. घारपुरे ७३ वर्षीय स्वेच्छानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर २००७ पासून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. आधी केले मग सांगितले, या वृत्तीने प्रत्येक उपक्रम आधी स्वतः राबवून नंतर ते इतरांना त्यासाठी प्रवृत्त करत आहेत. सार्वजनिक अस्वच्छता, प्लास्टिक भस्मासुर हे विषय तर त्यांना सतत अस्वस्थ करतात. कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील दिलीप कुलकर्णी यांचे गतिमान संतुलन आणि ठाण्यातील कौस्तुभ ताम्हणकर यांची शून्य कचरा संकल्पना वाचल्यापासून त्याबाबत आपणही काही केले पाहिजे, असे डॉ. घारपुरे यांना वाटत होते. त्यातूनच त्यांनी एक रविवार एक किलोमीटर स्वच्छता ही कल्पना समाजमाध्यमांवरून प्रसृत केली. त्यातून आज सावंतवाडीतील खासकीलवाडा गोठण परिसरातील प्लास्टिक बाटल्या आणि अन्य कचरा डॉ. घारपुरे आणि वसोली हायस्कूलचे शिक्षक दीपक तारी यांनी गोळा केला. केवळ अर्ध्या तासात प्लास्टिकच्या टाकून दिलेल्या सुमारे २०० बाटल्या आणि इतर कचरा त्यांनी गोळा केला. सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर स्वच्छता उपक्रम नेहमीच राबविले जातात. याशिवाय कारणपरत्वे स्वच्छता अभियाने सुरूच असतात. एक सामुदायिक उपक्रम म्हणून तो त्या त्या वेळी साजरा होतो. मात्र आपण स्वतः राहत असलेला परिसर प्रत्येकाने स्वतःच स्वच्छ ठेवला, तर अभियान राबविण्याची गरजच राहणार नाही, असे त्यांचे मत आहे.

त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, उपक्रमाला छान, अनुकरणीय, दर रविवारी हे करणार का, अशा प्रतिक्रिया व्यक्त करणारे संदेश आले. मात्र या उपक्रमात सावंतवाडीतील कोणी सहभागी झाले असेल, तर नावे कळवावीत, असे मूळ संदेशात म्हटले होते. पण त्याला प्रतिसाद नसल्याने किती जण अभियानात सहभागी झाले, याची माहिती मिळाली नाही. या उपक्रमाला तितकासा प्रतिसाद अपेक्षितही नव्हता. कारण स्वच्छतेबाबत समाजात पुरेसे गांभीर्य नाही. तरीही स्वेच्छेने अशा तर्हेाचे अभियान राबविले पाहिजे, असे मला वाटले. प्रतिसादापेक्षाही मी स्वतः काहीतरी केले, याचे मला समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया डॉ. घारपुरे यांनी व्यक्त केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply