सरत्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचा प्रारंभ उत्साहाचा असतो. जल्लोषाचा असतो. त्याचबरोबर नवसंकल्पांचाही असतो. याच मुहूर्तावर दरवर्षी नवनवे संकल्प केले जातात. दररोज सकाळी लवकर उठणे, चालायला-फिरायला जाणे, सायकलिंगची सवय लावून घेणे, नियमित व्यायाम आणि योगासने करणे, व्यसनांपासून दूर राहणे, नव्या कल्पना आखणे, वाचन-लेखनाचा निर्धार करणे, सामाजिक संस्था-संघटनांशी संपर्क वाढवून सामाजिक बांधिलकी जपणे, व्यक्तिगत जीवनातील काही उत्कर्षाचे टप्पे ठरविणे अशा तऱ्हेचे हे संकल्प असतात. ते सारे संकल्प निर्धाराने पूर्ण करण्याचाही संकल्प केला जातो, पण कितीही संकल्प केले तरी नव्याचे नऊ दिवसही हे संकल्प टिकत नाहीत. एव्हाना नवे वर्ष सुरू होऊन चार-पाच दिवस झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे असेच अनेक संकल्प धावपळीच्या दैनंदिन जीवनात विसरलेही गेले असतील. कारण असे संकल्प विसरून जाणे हाही दैनंदिन धावपळीचाच एक भाग होऊन गेलेला असतो. दरवर्षी आधीचे वर्ष संपते. नवे वर्ष सुरू होते. लवकरच त्याची सवय होते. नवेपण निघून जाते. नवसंकल्पांचेही तसेच होत असते.
एका संकल्पाच्या बाबतीत मात्र कोणालाही पळवाट काढता येत नाही. ज्याचा ज्याचा आर्थिक विषयाशी संबंध येतो, त्या प्रत्येकाला त्या संकल्पापासून पळवाट काढताच येत नाही. तो संकल्प म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येकाच्या दैनंदिन गरजा असतात. तशाच मासिक आणि वार्षिक गरजा असतात. नियोजन असते. घराच्या आणि इतर कर्जांचे हप्ते फेडायचे असतात. विमा पॉलिसी आणि इतरही गुंतवणूक असते. शैक्षणिक शुल्क भरायचे असते. या साऱ्यापासून सुटका होतच नसते. अगदी शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत आणि नोकरदारांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांनाच नाइलाजाने का होईना, आपापला अर्थसंकल्प पूर्ण करावाच लागतो. नाहीतर आर्थिक घडी आणि अर्थातच जीवनाची घडीही बिघडू शकते.
असे असले तरी काही संकल्प निर्धाराने पूर्ण करावे लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी सोडलेला असाच एक संकल्प होता तो राम मंदिराच्या उभारणीचा. निश्चित कालावधीत वेळापत्रक आखून राम मंदिराची नियोजनपूर्वक उभारणी झाली आहे आणि नियोजित तारखेला मंदिराच्या उभारणीचा संकल्प पूर्ण होणार आहे. अशा तऱ्हेच्या निर्धाराने पूर्ण केलेल्या संकल्पाला शिवसंकल्प म्हणतात. जो ठाम असतो. निश्चित असतो. यजुर्वेदात तन्मे मनाः शिवसंकल्पमस्तु या नावाचे स्तोत्र आहे. संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मनाने करावा, असे त्यात सूचित करण्यात आले आहे. निश्चित पूर्ण होणारा संकल्प म्हणजे शिवसंकल्प होय. पंतप्रधानांनी हा शिवसंकल्प सोडला. तो आता पूर्ण होत आहे. त्यात अनेक अडचणी आल्या. पण राजकीय आणि धार्मिक इच्छाशक्तीचा योग्य उपयोग करून घेऊन, देशाच्या अस्मितेला फुंकर घालून सर्व अडचणींवर मात करून त्यांनी संकल्प सिद्धीला नेला आहे. देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष वेधून घेईल, असे काम त्यांनी त्यातून साध्य केले आहेच, पण अयोध्या आणि त्या परिसराच्या विकासाने उत्तुंग झेप घेतली आहे. एखाद्या भागाचा विकास कसा करावा, याचा वस्तुपाठही त्यातून पंतप्रधानांनी घालून दिला आहे. त्यांनी केलेल्या शिवसंकल्पामुळे हे साध्य झाले आहे. वर्षाच्या प्रारंभीच त्यांचा शिवसंकल्प पूर्ण होणार आहे. प्रत्येकाने याच पद्धतीने आपापल्या छोट्याशा जीवनात का होईना, शिवसंकल्प केला तर त्याचा कितीतरी उपयोग दैनंदिन आणि सामाजिक जीवनात होऊ शकतो. राम मंदिराच्या शिवसंकल्पापासून एवढी तरी प्रेरणा आपण घेतली पाहिजे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ५ जानेवारी २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

