Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

व्याख्याने, लघुपटांद्वारे सागरी जैवविविधतेचा जागर

Advertisements

रत्नागिरी : येथील सागर महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी व्याख्याने, लघुपटांद्वारे सागरी जैवविविधतेचा जागर करण्यात आला.

समुद्रात खूप खोलवर जाऊन तिथले काही सॅंपल्स गोळा करून त्यांचा उपयोग संशोधनकार्यासाठी केला जातो. नियंत्रित मार्गाने व जलचर, सेल संस्कृती, रासायनिक संश्लेषण आणि आनुवांशिक अभियांत्रिकी यांच्या माध्यमातून मरीन बायोटेक्नॉलॉजीचा वापर करणे शक्य आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. समीर डामरे यांनी दिली. आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मरीन बायोटेक्नॉलॉजीवर बोलत होते.

डॉ. डामरे यांनी समुद्रात मिळणाऱ्या विविध गोष्टींविषयी माहिती दिली. तसेच बायोटेक्नॉलीजीचा इतिहास, समुद्रात होणारे संशोधन, त्यातील आव्हाने यावर इत्थंभूत माहिती दिली. चांद्रयान मोहिमेप्रमाणे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनेही यापूर्वी समुद्राच्या तळाशी जाऊन मोहीम राबवली आहे. परंतु तेथे खूप मोठे आव्हान आहे. यापुढेही अशा धाडसी मोहिमा राबवण्याची गरज आहे, असे शास्त्रज्ञ डॉ. समीर डामरे यांनी केले.

आज दिवसभरात सागर महोत्सवात भाट्ये किनाऱ्यावर अभ्यास सहलीत प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांनी मार्गदर्शन केले. कोरल्सवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. मंदार नाणजकर यांनी व्याख्यान दिले. कोरल्सच्या अभ्यासातून सृष्टीला होणारा फायदा, त्यांच्या अभ्यासाची गरज यावर डॉ. नाणजकर यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर खारफुटीची गुपिते या विषयावर डॉ. विनोद धारगळकर यांनी व्याख्यान दिले. यावेळी गोदरेज मॅंग्रूव्हजने बनवलेले खारफुटीवरील व्हिडीओ व खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेवरील लघुपट दाखवण्यात आले. सायंकाळी पेठकिल्ला ते मांडवी समुद्रकिनाऱ्यावर अभ्यास सहल काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते.

सागर महोत्सवाची उद्या (दि. १४ जानेवारी) सांगता होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वाजता होडीमधून कर्ला येथील खाडी परिसरात खारफुटी अभ्यास फेरी काढण्यात येणार आहे. यात डॉ. विनोद धारगळकर आणि गोदरेज मॅंग्रूव्हजचे हेमंत कारखानीस मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सांगता समारंभ होणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version