आसमंत फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत ११ जानेवारीपासून दुसरा सागर महोत्सव

रत्नागिरी : येथील आसमंत फाउंडेशनतर्फे सलग दुसऱ्या वर्षी सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ ते १४ जानेवारीदरम्यान समुद्र किनारा सफर, व्याख्याने, सी बोट प्रात्यक्षिक इत्यादी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.

आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवातील कार्यक्रम निश्चित झाले आहेत. येत्या ११ ते १४ जानेवारीदरम्यान हा महोत्सव रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रंगणार आहे. शिवाय सागरकिनारा सफर, लघुपट, व्याख्याने, होडीतून कांदळवन सफर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आसमंत फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.

महोत्सवाकरिता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासह राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, वाइईल्डलइफ कॉन्झर्वेशन सोसायटी – इंडिया, कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. या महोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने सहभागी होऊन पर्यावरण जागृती, सागर संवर्धनात सहभाग घ्यावा, असे आवाहन आसमंत फाउंडेशनने केले आहे.

सागर महोत्सवाचे उद्घाटन ११ जानेवारीला सकाळी ९ वाजता भारतीय नौसेनेचे कमोडोर श्रीरंग जोगळेकर (निवृत्त) यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंग उपस्थित राहतील. त्यानंतर ११ वाजता श्रीनिवास पेंडसे यांचे महासागराचे आध्यात्मिक दर्शन या विषयावर प्रवचन होईल. दुपारी १२ वाजता डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचे किनारा आणि सागरी अधिवास या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर दुपारी २ वाजता लघुपट, २.३० वाजता कमांडर व्ही. एम. आपटे (निवृत्त) यांचे हायड्रोग्राफीवर व्याख्यान होईल. सायंकाळी ३.४५ वाजता समुद्री गुहांमधील जीवन यावर धनुशा कवाळकर व्याख्यान देतील. त्यानंतर ४.४५ ते ५.१५ पर्यंत लघुपट दाखवला जाईल.

दुसऱ्या दिवशी १२ जानेवारीला सकाळी पुळणीकिनारा अभ्यास फेरी होईल. यात मार्गदर्शक प्रदीप पाताडे, डॉ. अमृता भावे अभ्यासपूर्ण माहिती देतील. सकाळी ९.३० वाजता आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान यावर डॉ. विजय मुळ्ये यांचे व्याख्यान होईल, तर १०.३० वाजता लघुपट, ११.१५ वाजता वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी- इंडियाचे डॉ. अनंत पांडे सागरी सस्तन प्राण्यांवर व्याख्यान देतील. दुपारी १२.१५ वाजता लघुपट, १.३० ते २ लघुपट, २ वाजता आसमंतचा कोस्टल मॅपिंग प्रकल्प यावर डॉ. प्रशांत अंडगे यांचे व्याख्यान होईल. दुपारी २.३० ते ३ या वेळेत इकॉलॉजिकल सोसायटीच्या सायली नेरूरकर व्याख्यान देतील. त्यानंतर ३ ते ४ या वेळेत नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे व्याख्यान होईल. सायंकाळी ४ वाजता लघुपट दाखवला जाईल. त्यानंतर ५ ते ६.३० या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी या खडकाळ किनाऱ्यावर सफर निघेल. यात प्रदीप पाताडे मार्गदर्शन करतील.

तिसऱ्या दिवशी १३ जानेवारीला सकाळी ७ ते ८.१५ या वेळेत भाट्ये किनाऱ्यावर सफर निघेल. यामध्ये प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ९.३० राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. समीर डामरे मरीन बायोटेक्नॉलॉजी या विषयावर व्याख्यान देतील. सकाळी १०.३० ते ११ या वेळेत लघुपट, ११.१५ वाजता कोरल्स या विषयावर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. नाणजकर व्याख्यान देतील. दुपारी १२.३० ते १ या वेळेत लघुपट दाखवण्यात येईल. त्यानंतर २ ते ३ या वेळेत खारफुटीची गुपिते या विषयावर डॉ. विनोद धारगळकर व्याख्यान देतील. ३.१५ ते ४.३० या वेळेत सी बोट प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने बनवलेली सी- बोट प्रात्यक्षिकात समुद्रात १५० फूट पाण्याखाली पाणबुडी गेली की तिच्यावरील कॅमेऱ्यांतून थेट प्रक्षेपण दाखवण्याचा अनोखा कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे. पाणबुडी खाली पाठवल्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पडद्यावर चित्रीकरण पाहता येणार आहे. हा कार्यक्रम अतिशय उत्कंठावर्धक ठरणार आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतर्फे याचे सादरीकरण केले जाईल. ४.४५ ते ६.३० या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी समुद्रकिनाऱ्यावर अभ्यास सहल काढली जाईल.

सागर महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी १४ जानेवारीला सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत खारफुटी अभ्यास फेऱ्या होणार आहेत. यात डॉ. विनोद धारगळकर आणि गोदरेज मॅंग्रूव्हजचे हेमंत कारखानीस मार्गदर्शन करतील. यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. याच दिवशी गोगटे- जोगळेकर कॉलेजमध्ये सागर महोत्सवानिमित्त सागर या विषयावर महाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply