समाज घडविण्यामध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची : उत्तम कांबळे

राजापूर : डोक्याने चालतात ते जग बदलतात, मात्र पायाने चालतात ते जग बिघडवतात. त्यामुळे समाज घडविण्यामध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

ओणी (ता. राजापूर) येथे कोकण मराठी साहित्य परिषदेची राजापूर शाखा, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, सुप्रभा सहकारी पतसंस्था आणि सुप्रभा वाचनालय (कोंडिवळे) यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या संमेलनाच्या स्थळाला कवी केशवसुत साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक दि. बा. पाटील, कोमसापच्या अध्यक्ष नमिता कीर, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. वासुदेव तुळसणकर, संयोजन समितीचे प्रमुख अ‍ॅड. शशिकांत सुतार, आप्पासाहेब खोत, गणपत भारती, अरविंद गोसावी, सूर्यकांत तुळसणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. कांबळे पुढे म्हणाले, शस्त्रामुळे क्रांती होत नसून झाली, तर ती टीका होते. मात्र शब्दांतून क्रांती होते. त्यामुळे समाजामध्ये होत असलेल्या बदलांचा मागोवा घेऊन साहित्यिकांनी माणूसपण जपणारे लेखन करणे गरजेचे आहे. विनाकारण लेखनाची माणसाच्या सातबारावर नोंद होत नाही. त्यामुळे आपण काय लिहितो, याचा फेरविचार होणे गरजेचे आहे. माणूस आणि संगणक या लढाईत माणसाच्या बाजूने, बैल आणि मोट या लढाईत बैलाच्या बाजूने, भांडवलशाही आणि लोकशाही यांच्यामध्ये लोकशाहीच्या बाजूने, धर्मांधपणा आणि संविधान यांमध्ये संविधानाच्या, तर कुंभमेळा आणि संमेलन यामध्ये आपण संमेलनाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. रडून जग बदलता येत नसून जग बदलण्यासाठी लढायला हवे.

तत्पूर्वी, कोकण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक दि. बा. पाटील यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, माणसातला माणूस जागविण्याचे आणि घडविण्याचे काम साहित्य संमेलने करीत असतात. त्याचवेळी माणसाला दिशा देण्याचे आणि त्याच्यातील क्रूरता कमी करण्याचे काम साहित्य संमेलने करीत असतात. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाचे आयोजन होऊन त्यातून भाषेचा अन् साहित्याचा जागर होणे गरजेचे आहे. मराठी भाषेमध्ये प्रदूषण वाढले असून या भाषेचे पुढे काय होणार, याचे उत्तर शोधण्यासाठी साहित्य संमेलनांची गरज आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, तो तिचा हक्क आहे. तो मिळाला पाहिजे.

यावेळी सौ. कीर यांनी ग्रामीण भागातील नवोदित लेखक-कवींमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची आवश्यकता असल्याचे मत मांडले. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. तुळसणकर यांनी संमेलन आयोजनाचा हेतू तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचा आढावा घेतला. अ‍ॅड. सुतार यांनी प्रास्ताविकात साहित्य संमेलनाचा आढावा घेतला. डॉ. शैलेश शिंदेदेसाई यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञेश देवस्थळी यांनी केले. यावेळी बालसाहित्यिक मदन हजेरी, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, साहित्यिक सुभाष लाड इत्यादी मान्यवरांसह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply