Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

बुद्धिबळाच्या पहिल्या शिष्यवृत्तीचा मानकरी सौरीश कशेळकर

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रथमच बुद्धिबळाकरिता शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली असून कै. लीला रामचंद्र फडके यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पहिल्या शिष्यवृत्तीकरिता सौरीश कशेळकरची निवड झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत बुद्धिबळ शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार या वर्षातील पहिली शिष्यवृत्ती रत्नागिरीच्या सौरीश कशेळकर याला जाहीर करण्यात आली आहे. मूळचे चिपळूण येथील आणि सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेले चार्टर्ड अकाउंटंट आदित्य फडके यांनी त्यांच्या आजीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही बुद्धिबळ शिष्यवृत्ती सुरू केली आहे. रोख पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.

बुद्धिबळ खेळात आणि विशेषकरून क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवान बुद्धिबळपटूला प्रतिवर्षी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पुढील वर्षीपासून शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. खेळाडूंना रत्नागिरीबाहेर जाऊन खुल्या स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने इतर आर्थिक योजनाही प्रतिवर्षी राबविण्यात येणार आहेत.

सौरीश कशेळकर याने गेल्या वर्षी बुद्धिबळात सातत्याने चांगल्या कामगिरीची नोंद केली. गोव्यात पार पडलेल्या कै. श्री वासुदेवा डेम्पो खुल्या फिडे मानांकित क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सौरीशने आपल्या फिडे गुणांकनात तब्बल १८१ गुणांची वाढ केली होती. तसेच कर्नाटकातील निपाणी येथे झालेल्या कै. रतनबाई भाईचंद शाह स्मृती निपाणी ग्रँड खुल्या जलद फिडे मानांकन स्पर्धेतदेखील त्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. या एकाच स्पर्धेत सौरीशने स्वतःचे जलद फिडे गुणांकन तब्बल १६१ गुणांनी वाढवले. संपूर्ण स्पर्धेत त्याने सर्वांत जास्त फिडे रेटिंग वाढवणारा खेळाडू असा मान प्राप्त केला होता. या स्पर्धेत कर्नाटकसह गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यांतून सहभागी झालेल्या एकूण १८० बुद्धिबळपटूंमधून सौरीशने चतुर्थ क्रमांक पटकावला. रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या डिलाइट २५ वर्षांखालील जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपददेखील त्याने पटकावले. सांगली, कोल्हापूर येथील विविध स्पर्धा, सिंधुदुर्ग येथील शालेय विभागीय स्पर्धा तसेच अनेक जिल्हा निवड स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय यश प्राप्त केले.

रत्नागिरी जिल्ह्यात बुद्धिबळाचा प्रसार जोमाने व्हावा आणि खेळाडूंना क्लासिकल स्वरूपात बुद्धिबळ खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने मागील वर्षीच्या जून महिन्यात जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रम राबविण्याचे जाहीर करण्यात आले होते. या कार्यक्रमांतगत आतापर्यंत चार क्लासिकल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच रत्नागिरीमध्ये दिलीप श्रीपाद टिकेकर बुद्धिबळ साहित्य वाचनालयदेखील सुरू करण्यात येणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version