रत्नागिरी : रत्नागिरीतील सौरीश कशेळकर आणि आर्यन गोडबोले या दोघा बुद्धिबळपटूंनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
गोव्यात झालेल्या क्लासिकल स्पर्धेत सौरीश कशेळकरच्या फिडे रेटिंगमध्ये तब्बल १८१ गुणांची वाढ झाली, तर आग्रा येथे झालेल्या ऑल इंडिया एअर फोर्स स्कूल स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये आर्यन गोडबोलेला वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले.
रत्नागिरीतील सौरीश कशेळकर आणि मूळचा खेड येथील आर्यन गोडबोले यांनी राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. सौरीश व आर्यन जवळपास दोन वर्षांपासून विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत.
नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या कै. श्री वासुदेवा डेम्पो खुल्या फिडे मानांकित क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सौरीशने स्वतःपेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंविरुद्ध डाव जिंकत एकाच स्पर्धेत आपल्या फिडे गुणांकनात तब्बल १८१ गुणांची वाढ केली. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटकच्या खेळाडूंविरुद्ध विजय प्राप्त करीत सौरीशने ९ फेऱ्यांमध्ये ६.५ गुणांची नोंद केली. क्लासिकल स्वरूपात सहा दिवस आयोजित करण्यात आलेल्या या खुल्या फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत संपूर्ण देशभरातून आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित १०२ खेळाडूंसह एकूण १६० पेक्षा अधिक बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. त्यांमध्ये त्रेसष्ठावे मानांकन असणाऱ्या सौरीशने अकरावा क्रमांक पटकावला.
मूळचा खेड येथील आणि बुद्धिबळाचा श्रीगणेशा रत्नागिरीत गिरवलेला आर्यन गोडबोले सध्या पुण्यात वास्तव्यास असतो. आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया एअर फोर्स स्कूल स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी आर्यनची निवड त्याच्या शाळेतून करण्यात आली होती. आर्यनने या स्पर्धेत सर्व फेऱ्यांमधील सामने जिंकत निर्विवाद प्रथम क्रमांकासह वैयक्तिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच शाळेला सांघिक ब्रॉंझ पदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
Follow Kokan Media on Social Media

