रत्नागिरी : येथील शिर्के उद्यानात नगरपालिकेने उभारलेल्या विठ्ठलमूर्तीचे अनावरण समस्त वारकरी आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. ५ फेब्रुवारी) करण्यात आले.

पुंडलीक वर दे.. हरी विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ भगवान की जय..’माऊली माऊली चा जयघोष, वारकऱ्यांच्या टाळ, वीणा आणि मृदुंगाच्या तालावर आज अवघ्या रत्नागिरीत पंढरी अवतरली होती. पंढरपूरच्या वारीतील हिरा आणि मोती या अश्वांचे रिंगण नागरिकांनी अनुभवले.
या अनावरण सोहळ्याला संत साहित्य संमेलनाध्यक्ष हभप माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील, हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप निवृत्ती महाराज नामदास, श्रीमंत सरदार उर्जितसिंह राजे शितोळे, हभप मनोहर महाराज औटी, हभप देवीदास महाराज ढवळीकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
मारुती मंदिर ते हॉटेल विवेकचे पटांगण अशी वारकऱ्यांची दिंडी सायंकाळी आली. यामध्ये माऊलींची पालखी होती. पालकमंत्री श्री. सामंत देखील दिंडीत साहभागी झाले होते. विठू माऊलीच्या जयघोषात, वीणा, टाळ मृदुंगाच्या तालावर देखणे रिंगण समस्त रत्नागिरीकरांना पाहायला मिळाले. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख श्रीमंत सरदार श्री. शितोळे यांच्या हिरा आणि मोती या अश्वांनी हे रिंगण पूर्ण केले. यानंतर समस्त वारकरी शिर्के उद्यानातील श्री विठ्ठल मूर्ती अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित झाले.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण केले. संमेलनाध्यक्ष हभप शिवणीकर महाराज यांच्या हस्ते कळ दाबून श्री विठ्ठल मूर्तीचे अनावरण सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माऊलींच्या नामाचा एकचा जयघोष झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचाही जयजयकार झाला. फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली.
पालकमंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले, आज वारकऱ्यांच्या हस्ते झालेला सत्कार हा आजवरचा सर्वांत मोठा आहे. त्याला गालबोट लागेल असे कृत्य माझ्या हातून होणार नाही. वारीनंतर येथे अश्व आला, रत्नागिरीत पहिले रिंगण झाले. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला संस्कार दिले. महाराष्ट्र घडवला. तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या माऊलींचे सदैव स्मरण होण्यासाठी ही मूर्ती इथे उभारण्यात आली आहे. आजच्या सोहळ्याने वारी केल्याचे भाग्य मला मिळाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना पैठणला संतपीठ करता आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली असून, पंढरपूरला संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी वारकरी साहित्य परिषदेतर्फे श्री विठ्ठलाची चांदीची मूर्ती देऊन पालकमंत्री श्री. सामंत यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर हभप मनोहर महाराज औटी, वैकुंठवासी भानुदास महाराज ढवळीकर यांच्यावतीने देवीदास महाराज ढवळीकर यांचाही सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी तुषार बाबर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक श्री. काकडे यांचाही सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी आभार मानले. पसायदानाने सोहळ्याचा समारोप झाला. त्यानंतर हभप बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले.

व्हिडिओ पुढील लिंकवर…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

