संस्कृत उपकेंद्रात गुरुपौर्णिमेला नाट्यशास्त्रविषयक मंथन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला नाट्यशास्त्राविषयीच्या माहितीचे मंथन करण्यात आले.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या सहकार्याने आणि नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख नियोजनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन आणि सरस्वती व महर्षी व्यास यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सुरुवातीस गुरुमहिमा सांगणारे गीत उपकेंद्रातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध व्यावसायिक व नाट्यकर्मी राजन मलुष्टे आणि ज्येष्ठ नाट्य कलाकार विजयकुमार रानडे उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गुरू शब्दाचे महत्त्व विशद करतानाच ज्ञानाची शिदोरीदेखील दिली.

श्री. मलुष्टे म्हणाले की, गुरू नेहमीच जीवनात मार्गदर्शन करतो. आलेल्या संधीचे सोने करण्याची गरज आहे. त्यामुळे नेहमीच ज्ञान संपादित करण्याची अंगी वृत्ती हवी. प्रत्येकाने उघड्या डोळ्यांनी जग पाहायला शिकले पाहिजे. समाज आणि जग यांच्याडून व्यक्ती सतत शिकत असतो.

ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री. रानडे म्हणाले की, नाटकाच्या दृष्टीने आवाज व त्यातील नियंत्रण अत्यंत गरजेचे असते. यामुळे आपल्या आवाजावर संयम ठेवून नटाला मिळणाऱ्या पात्रानुसार त्याचा वापर करावा. यावेळी नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी खास ओमकाराचे प्रात्यक्षिकदेखील त्यांनी घेतले.

नाट्यशास्त्र प्रशिक्षक डॉ. शशांक पाटील यांनी नाट्यशास्त्र अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगताना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाटकाची साधना निर्मळ मनाने करा, असा गुरुमंत्र दिला. यावेळी नाट्यशास्त्र विभागाकडून लक्षवेधी नृत्य सादर करण्यात आले.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील प्राध्यापक अविनाश चव्हाण यांनी गुरू शब्दाचा अर्थ, महर्षी व्यास यांचे कार्य आपल्या खास अभंगवाणीतून उलगडले. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी गुरू शब्दामागील विचार आणि आपल्या जीवनातील गुरूचे स्थान नेमक्या शब्दांत सांगितले.

कार्यक्रमाला रत्नागिरी नाट्यशास्त्र सहाय्यक प्राध्यापिका अॅड. रजनी सरदेसाई आदी मान्यवर, तसेच रत्नागिरी उपकेंद्रातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनिया पाटील यांनी केले. धन्यवाद समर्पण सौ. अनघा नागवेकर यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply