साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे संस्कार परीक्षा

मालवण : साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे संस्कार परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

हे वर्ष पूज्य साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष म्हणून साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेने साजरे करावयाचे ठरविले आहे. “प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी. कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे” असा संदेश देणाऱ्या संस्कारभूषण पूज्य साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड (दापोली) येथे झाला. त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘श्यामची आई संस्कार परीक्षा’ हा उपक्रम घेण्याचे कथामालेने ठरविले आहे. काही शाळांमध्ये श्यामची आई पुस्तकाच्या संक्षिप्त प्रती परीक्षार्थी मुलांना देण्यात आल्या. त्यात गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल (माळगाव), आर.पी. बागवे हायस्कूल (मसुरे), ओझर विद्यामंदिर (कांदळगाव), ज्ञानदीप विद्यामंदिर (वायंगणी), न्यू इंग्लिश स्कूल (आचरे), जनता विद्यामंदिर (त्रिंबक), प्रगत विद्यामंदिर (रामगड), भगवती हायस्कूल (मुणगे), आर. बी. राणे हायस्कूल (नारिंग्रे-देवगड) या माध्यमिक शाळा, तर केंद्रशाळा मसुरे क्र. १, मसुरे देऊळवाडा, जि. प. शाळा वेर्ली, मालवण दांडी, कोळंब क्र. १, सर्जेकोट, कातवड, देवली खालची, तोंडवली वरची, आचरे क्र. १, आडवली क्र १, पळसंब क्र. १ या जिल्हा परिषद शाळांमधील पाचवी ते सातवीच्या सुमारे ६०० मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले असून ही मुले परीक्षेला बसणार आहेत.

विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या हाती पुस्तक जाईल. चार महिन्यांनंतर या पुस्तकांवर ‘श्यामची आई संस्कार परीक्षा’ घेतली जाणार असून यशवंत विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

या उपक्रमातबाबत साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी सांगितले की, कथामालेची मालवण शाखा गेली वीस वर्षे ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेत असते. कथाकथन स्पर्धा, संस्कार शिबिरे, कथाकथन तंत्र-मंत्र, आकाश दर्शन, निसर्ग सहल आदी उपक्रम नियमित राबवले जातात. यावर्षी निवडक विभागातील सहाशे मुलांची साने गुरुजी संस्कार परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. ‘श्यामची आई’ ही गुरुजींची कादंबरी गेल्या चार पिढ्या मुलांच्या हृदयात घर करून आहे. त्या पुस्तकाने दिलेले संस्कार कुटुंबाकुटुंबात रुजविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply