पुणे : पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक विद्यापीठाची डी. लिट.पदवी समारंभपूर्वक प्नदान करण्यात आली.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४२ वा पदवीप्रदान सोहळा शनिवारी (दि. ८ मार्च) मुकुंदनगर येथील टिमविच्या संकुलात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पितांबरीचे श्री. प्रभुदेसाई, ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे आणि कायनेटिक ग्रीन एजर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लि.च्या संस्थापक व कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात आले.
सन्मानाला उत्तर देताना श्री. प्रभुदेसाई म्हणाले, उद्योजक वर्षानुवर्षे काम करत असतात आणि ब्रँड विकसित करतात. ब्रँड डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. ब्रँडला मनी – मशीन म्हणून बघितले जाते. पण ब्रँड घडवणारेसुद्धा सामाजिक जबाबदारी घेणारे नागरिक असतात. त्यामुळे हा सन्मान खूप महत्त्वाचा आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘पितांबरी ब्रँड’ची दखल घेऊन हा पुरस्कार मला प्रदान केला याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे.
ते पुढे म्हणाले, सनातन संस्थेची साधना करताना सच्चिदानंद परमपूज्य डॉ. जयंत आठवले यांनी ‘आध्यात्मिक बुद्ध्यांकाचे’ महत्त्व सांगितले. आपल्या प्रारब्धावर आपल्या कर्माने, साधनेने मात करता येते हे त्यातूनच समजले. मॅनेजमेंटमधील प्रिन्सिपल आणि अध्यात्मातील प्रिन्सिपल बऱ्यापैकी जुळतात. साधना केल्याने बुद्धी सूक्ष्म होते. ज्याचा आपल्याला खूप फायदा होतो. हेच उद्योजकांना सांगण्यासाठी मी परमपूज्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात तीन सत्संग घेतले आणि ते घेऊन घरी परतल्यानंतर मला टिळक विद्यापीठातून ही पदवी मिळणार असल्याचे समजले आणि पुन्हा एकदा परमेश्वर आपल्या पाठीशी असल्याची अनुभूती मिळाली, असेही श्री. प्रभुदेसाई म्हणाले.
यावेळी टिमविच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणिती टिळक, प्रभारी कुलसचिव सुवर्णा साठे, विश्वस्त सरिता साठे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. प्रा. अनुजा पालकर यांनी श्री. प्रभुदेसाई यांच्या मानपत्राचे वाचन केले.
डॉक्टर म्हणजे काय?
डॉक्टरेट मिळाल्यानंतर त्याचे विश्लेषण उद्योजकीय दृष्टीने श्री. प्रभुदेसाई यांनी केले. ‘डॉक्टर’ या शब्दातील ‘डी’ म्हणजे – ‘डिफ्रंशिएटर’ अर्थात आपले प्रॉडक्ट दुसऱ्यांपेक्षा वेगळे कसे असेल ते पाहणे, ‘ओ’ म्हणजे – ‘ऑब्जेक्टिव्ह’ आपल्या संस्थेच ध्येय काय आहे ते लक्षात घेऊन काम करणे, ‘सी’ म्हणजे – Collectively अर्थात हा सन्मान केवळ माझ्या यशाचा भाग नाही तर संपूर्ण पितांबरी परिवाराचे त्यात एकत्रितपणे योगदान आहे. कारण आपल्या संकल्पनेला जेव्हा सर्वांकडून एकत्रितपणे स्वीकृती मिळते, तेव्हाच यश मिळते. ‘टी’ म्हणजे ‘टाइम मॅनेजमेंट’ म्हणजेच वेळेत सगळ्या गोष्टी पूर्ण होणे, याला अत्यंत महत्त्व आहे. पुढचा ‘ओ’ म्हणजे ‘ऑर्डर’ कोणतीही गोष्ट क्रमानेच पुढे झाली पाहिजे. शेवटचा ‘आर’ म्हणजे ‘रिझल्ट’ आपण जे काही कृतीत आणणार आहोत त्याला शंभर टक्के रिझल्ट आहेत का याची खात्री असली पाहिजे, असा वेगळा विचार त्यांनी मांडला.रसिकांनी मोठ्या संख्येने या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

