देवरायांच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत करा; मंदिर महासंघाचे रत्नागिरीत घंटानाद आंदोलन

रत्नागिरी : देवराई/देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानांच्या नावे करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आज (१० मार्च) रत्नागिरीत जयस्तंभ येथे घंटानाद आंदोलन केले. त्यात मंदिरांचे विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन जिल्हाभरात अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासन आणि प्रशासनाला दिला आहे. देवरहाटी/देवराई हा ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा विषय आहे. असे असूनही महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६मधील प्रावधानाचा भंग करून, तसेच मंदिरे धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर नसल्याचे कारण देऊन बेकायदेशीरपणे देवस्थानांचे नाव कमी केले आणि ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद करण्यात आली. यातून शासनाने हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन केले आहे. शासनाने हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अनादर केल्याचा निषेध आंदोलनातून नोंदवण्यात आला.

आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले. या वेळी संगमेश्वर येथील श्रीदेव नीळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जयंत आठल्ये, सचिव चैतन्य सरदेशपांडे, लांजा येथील श्री जुगाई पौलस्त्येश्वर मंदिराचे विश्वस्त मुकुंद गांधी, संतोष लिंगायत, कारवली येथील श्री काळंबा देवीचे अरविंद वरेकर, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, नेवरे येथील श्रीदेव विश्वेश्वरचे अध्यक्ष मुकुंद परांजपे, पाली येथील हिंदुत्वनिष्ठ प. वि. सावंत, मुरुगवाडा येथील श्री भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय पिळणकर, राजापूर येथील धोपेश्वर देवस्थानचे प्रकाश कांबळे, गोठणे दोनिवडेचे सुधीर विचारे, शीळ येथील गोपाळ गोंडाळ, ‘न्यू हनुमान मंदिर, खडपेवाडी-राजापूर’चे अध्यक्ष मनीष शिंदे, ‘आंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ, राजापूर’चे अध्यक्ष प्रकाश लोळगे, राजापूरच्या श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिराचे विजय हिवाळकर, वाटद-खंडाळा येथील सौ. प्राजक्ता जंगम यांच्यासह १००हून अधिक विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ नागरिक उपस्थित होते.

नेवरे येथील श्री देव आदित्यनाथ मंदिराचे अध्यक्ष मनोहर मोरे यांनी सांगितले, की ‘देवस्थानांना विचारात न घेता, कोणतीही सूचना न देता आणि आपण देवस्थानाचे वारस आहोत या भ्रमाने देवस्थान जमिनी शासनाने कह्यात घेतल्या. शासनाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि या देवरहाटी पूर्ववत देवस्थानच्या नावे व्हाव्यात, अशी मागणी करतो.’

हिंदू जनजागृती समितीचे गोविंद भारद्वाज म्हणाले, ‘कोणत्याही जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्याचे सक्षम प्राधिकरण हे दिवाणी न्यायालय असताना महसूल विभागाद्वारे देवराई/देवरहाटी जमिनीचा मालकी हक्क पालटणे ही बेकायदा गोष्ट ठरते. हा राज्यघटनेने दिलेल्या हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवरील घालाही आहे. शासनाने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करून नोंदी देवस्थानच्या नावे पूर्ववत कराव्यात.’

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे रत्नागिरी जिल्हा संघटक सुरेश शिंदे म्हणाले, ‘शासनाने देवस्थानची देवरहाटीवरील नावे कमी केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंदिर विश्वस्त आता मंदिरांच्या हक्कासाठी मंदिर महासंघाच्या माध्यमातून जागृत आणि संघटित होत आहेत. देवरहाटीच्या मागणीला यश मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवू.’

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply