रत्नागिरी : ‘महिलांना आकाशात भरारी मारायची असेल, तर पंखांची गरज नाही. शिक्षणातून मिळणाऱ्या तेजाने त्या कुठेही जाऊ शकतात. समाजात स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने यायला हवी असेल, तर केवळ प्रतीकात्मकता नको. महिलांना मनाचे, विचारांचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे,’ असे प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि इफ्को-टोकियोच्या संचालिका उमा सुरेश प्रभू यांनी १० मार्च रोजी संध्याकाळी रत्नागिरीत केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वूमन्स फेस्ट या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे शिरगावमधून आता रत्नागिरी शहरात मारुती मंदिर परिसरात स्थलांतर झाले असून, त्या नव्या वास्तूचा शुभारंभही सोमवारी झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २८ महिलांचा, तसेच यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच, या शिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींचा फॅशन शोही या वेळी झाला. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि कृषी उद्योजिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी, पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी, रत्नागिरीचे प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई, तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पुण्यातील मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालक माधवी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
‘स्त्री-पुरुषांच्या कामांमधील भेद नकळतपणे लहान मुलांवर बिंबवले जातात. तसे न होता स्त्री आणि पुरुष हे दोघंही माणूस आहेत, अशी शिकवण बालसंगोपन करताना रुजवली गेली पाहिजे,’ अशी अपेक्षा उमा प्रभू यांनी व्यक्त केली. तसे झाले, तर महिला दिन साजरा करण्याची गरज उरणार नाही, असे प्रभू म्हणाल्या. महिलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत आणि त्यांची जबाबदारीही घेता आली पाहिजे, असेही प्रभू म्हणाल्या. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
संपदा जोगळेकर-कुळकर्णी म्हणाल्या, ‘अडचणी प्रत्येकीच्याच वाट्याला येतात; मात्र त्यावर मात करण्याचे ज्यांना सुचते त्या सन्मानाला पात्र ठरतात. महिलांसाठी आत्मसन्मान आणि आत्मकर्तृत्व हा पहिला दागिना आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःचे जगणे आनंदी आणि समृद्ध करण्याचा दृष्टिकोन ठेवायला हवा. भारतीय स्त्री मोठी होताना कायम कुटुंबाला घेऊन मोठी होते, हे नीला सत्यनारायण यांचे वाक्य मी कायम लक्षात ठेवले आहे. कर्तृत्व महत्त्वाचे आहेच; पण घरातील माणसांचा पाठिंबाही खूप महत्त्वाचा आहे. महिलांनी स्वतःला सिद्ध तर करायला हवे; पण सिद्धीची झूल अंगावर घेऊ नये. मूलभूत हक्कांसाठी पूर्वी ज्यांनी संघर्ष केला, त्यामुळे आताच्या काळात आपण मूलभूत गरजा भागवून त्याच्या पुढे जातो आणि त्यासाठी पुरस्कार घेतो; मात्र ही तफावत काही जणींच्या आयुष्यात आजही भरून आलेली नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशा असतील, ज्यांच्या घरी त्यांच्या पायात साखळ्या असतील. ही तफावत लवकर भरून येण्यासाठी मी शुभेच्छा देते.’ (उर्वरित बातमी स्लाइड शोच्या खाली)
संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी या वेळी आपला शहरातून ग्रामीण भागाकडे झालेला प्रवासही उलगडून दाखवला. आता त्या फुणगूस (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या गावात शेतकरी म्हणून राहतात. आधीचे कर्तृत्व असले, तरी इथे आल्यावर शून्यापासून परत सुरुवात करावी लागली. नावीन्याने शिकायला लागले, स्वतःला सिद्ध करायला लागले; मात्र बंडखोरी न करता एक आई म्हणून सर्व परिस्थिती हाताळता आली आणि स्त्रियांबद्दल पारंपरिक विचार असलेल्या ठिकाणीही सर्वांची मने जिंकता आली. या वाटचालीत कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा मिळाला, असे जोगळेकर म्हणाल्या.
संचालक माधवी शिंदे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची माहिती आणि व्याप्ती सांगितली. ‘पूर्वीच्या काळी महिला काही तरी अडचण आली, तर उभ्या राहायच्या. आताच्या काळात मात्र महिला संकट आल्यावर काही तरी करण्यापेक्षा आधीच चाहूल ओळखून प्रयत्न करतात, स्वतःला सक्षम करतात. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. हा फरक आताच्या काळात निश्चितपणे दिसतो,’ असे निरीक्षण उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांनी नोंदवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी आश्रमगीत सादर केले. अनघा निकम-मगदूम यांनी सूत्रसंचालन, तर स्वप्नील सावंत यांनी आभारप्रदर्शन केले. स्नेहा जोशी यांनी पसायदान सादर केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




