रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने ९६.७४ टक्के निकालासह पहिले स्थान कायम राखले आहे. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.
- या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
- खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून, त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी परीक्षेला बसले. २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
- या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
- या परीक्षेला नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ६७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
- सर्व विभागीय मंडळांतून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४ %) सर्वाधिक असून, सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा (८९.४६ %) आहे.
- सर्व विभागीय मंडळांतून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% असून, मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ % आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७% ने जास्त आहे. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० % आहे.
- गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी https://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाइटवर माहिती मिळेल. निकालाची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत.





