रत्नागिरीजवळच्या नाचणे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत छंद वर्ग आयोजित केला आहे. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम तेथे संयुक्तपणे राबविला जात आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांमधील मुलांसाठी तेथे क्रीडा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच छोटी छोटी कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न या छंद वर्गातून केला जात आहे. विशेष म्हणजे हा छंद वर्ग पूर्णपणे मोफत चालविला जातो. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी असे खासगी छंद वर्ग आयोजित केले जातात. मात्र ते सशुल्क असतात. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सहकार्यातून नाचणे येथील छंद वर्ग चालविला जात असल्यामुळे तो पूर्णपणे मोफत आहे. ग्रामस्थ आणि काही देणगीदार यांच्या मदतीतून हा वर्ग चालविला जातो. असा छंद वर्ग चालविणारी नाचणे ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी, पण रत्नागिरी जिल्ह्यातील मात्र जिल्हा परिषदेची ती एकमेव शाळा आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत या शाळांमधील परीक्षा पूर्ण होत असत. त्यानंतर फक्त शिक्षक मुलांचा निकाल आणि अन्य प्रशासकीय बाबींसाठी शाळेत अनिवार्यपणे उपस्थित राहत असत. मुलांना मात्र सुट्टी असे. पण नव्या बदलामुळे परीक्षा एप्रिलच्या अखेरपर्यंत घेतल्या जातात. त्यामुळे मुले गुंतूनच राहतात. ती त्यांच्या नेहमीच्या अभ्यासातच व्यस्त राहतात. खासगी छंद वर्गामध्ये जायचे झाले तर त्यानंतरच्या काळात म्हणजे मे महिन्यातच त्यांची निवड करावी लागते. पण अशा खासगी छंद वर्गांमध्ये शाळेतील सर्व मुले जातातच, असे नाही. अनेकदा आर्थिक प्रश्न असतोच. शिवाय एकदाची शाळा संपून सुट्टी सुरू झाल्याची भावना असते. त्यामुळे छंद वगैरे जोपासणे त्या मुलांना शक्यच होत नाही. या मुलांची ही अडचण लक्षात घेऊन आणि त्यांची गरज लक्षात घेऊन नाचणे ग्रामपंचायतीने छंद वर्ग आयोजित केला आहे. हे एक चांगले उदाहरण आहे.
नाचणे शाळेचे हेच उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळांनीच आता सुट्टीतील छंद वर्गांचे आयोजन करायला हवे. हे छंद वर्ग शाळेच्या वेळेतच होऊ शकतील. मुले नेहमी शाळेत अभ्यासासाठी येतात. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वाव मिळत नाही. पण शाळांनीच छंद वर्ग आयोजित केले, तर मुलांना त्याचा आस्वाद घेता येऊ शकेल. नेहमीचे शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते बाजूला ठेवून छंद वर्गात वेगळेच नाते निर्माण होऊ शकते. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारे शिक्षक मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देऊ शकत नाहीत. असे कला गुण छंद वर्गांमधून जोपासले जाऊ शकतात. शैक्षणिक वर्षाची सांगता एप्रिल महिन्या अखेरीलाच होणार असल्यामुळे मधल्या काळात हे छंद वर्ग घेतले जाऊ शकतात किंवा परीक्षा पूर्वीप्रमाणेच वेळेवर घेऊन राहिलेल्या पंधरा दिवसांमध्ये हे छंद वर्ग घेता येऊ शकतील. शाळेव्यतिरिक्त परिसरातील अन्य विद्यार्थीही या वर्गांचा लाभ घेऊ शकतील. त्यानिमित्ताने शिक्षकांना अन्य विद्यार्थ्यांशी, पालकांशी, परिसराशी, समाजाशी संपर्क ठेवता येईल. अन्य शाळांमधील उपक्रमांची माहिती घेता येईल. अन्य विद्यार्थ्यांच्या कौशल्यांविषयीही माहिती होऊ शकेल. छंद वर्गातील वातावरण अनौपचारिक असल्यामुळे तेथे अनेक गोष्टींचा, शैक्षणिक त्रुटींचाही उलगडा होऊ शकेल. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही या छंद वर्गांचा उपयोग होऊ शकेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २ मे २०२५)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

