रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने चार मे रोजी (रविवार) आयोजित केलेल्या पहिल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये ४००हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. मुलांनी विविध ग्रह, खगोलशास्त्रज्ञांचे फोटो व माहिती आणि प्रतिकृती सायकलवर साकारली होती. तसेच काहींनी चांद्रयानाची प्रतिकृतीसुद्धा सायकलवर लावली. दोन गटांतील बालदोस्तांनी पाच आणि दहा किलोमीटर सायकल चालवली. उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासन, पालकांचे सहकार्य यामुळे या उपक्रमाचे कौतुक केले आहे. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
इस्रो, आयुका या संस्थांनी आणि ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनीदेखील हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे विशेष कौतुक केले. या उपक्रमाचे इतर शहरातही अनुकरण करण्याची सूचना त्यांनी केली आहे. खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होईल, असे दा. कृ. सोमण यांनी आवर्जून सांगितले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
विद्यार्थ्यांनी मोबाइलपासून दूर राहण्याकरिता व शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी किड्स सायक्लोथॉनची संकल्पना रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सत्यात आणली. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला ३०० विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट होते. परंतु ते पार करून ४००पेक्षाही जास्त बालदोस्तांनी सायकलमध्ये भाग घेतला. सुवर्णसूर्य फाउंडेशनने ‘छोटे अंतराळवीर चालवणार सायकल’ (Little Astronauts on Wheels) अशी संकल्पना मांडली व ती सत्यात उतरवली. वेगवेगळ्या खगोलीय संकल्पना विद्यार्थ्यांनी राबवल्या.

तारांगण येथे शनिवारी सायंकाळी विद्यार्थ्यांना बिब नंबर, स्नॅक्स व पहिल्या ३०० जणांना टी-शर्टचे वितरण करण्यात आले. त्या वेळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे व खगोल अभ्यास केंद्राचे प्रा. बाबासाहेब सुतार यांनी विद्यार्थ्यांना टेलिस्कोपद्वारे चंद्र, ग्रह, ताऱ्यांची सैर घडवली. या कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ हा सन्मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात करण्यात आला. कोरोना काळापासून आतापर्यंत लहान मुलांना सायकलची गोडी लावण्यासाठी ते कार्यरत आहेत.

रविवारी (४ मे) सकाळी सात वाजता सर्व बाल अंतराळवीर सायकलिस्ट तारांगण येथे एकत्र आले. सुरुवातीला दहा किलोमीटरच्या सायक्लोथॉनमधील सायकलिस्टना पाठवले. त्यानंतर ५ किमी अंतरासाठी सहभागी झालेल्या सायकलिस्टना सोडण्यात आले. हॉटेल विवेकचे विक्रांत देसाई, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध, हिंद सायकल्सचे मंगेश शिंदे, अजय पानगले यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायक्लोथॉनला प्रारंभ झाला. या वेळी सायकलिस्टच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. ही स्पर्धा नव्हती, तर फक्त सायक्लोथॉन होती. त्यामुळे यात दिलेले अंतर पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच पदक आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर बालदोस्तांनी चिठ्ठ्यांमधून काढलेल्या भाग्यवान क्रमांकांना बक्षिसे दिली. क्लबचे सक्रिय सदस्य योगेश मोरे यांच्यामार्फत मिळालेल्या या शालेय साहित्याच्या बक्षिसाने विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला.

या सायक्लोथॉनसाठी हिरो सायकल्स, हिंद सायकल ट्रेडिंग कंपनी, सुरस स्नॅक्स, मनहा इंटरनॅशनल, हॉटेल विवेक, आनंदकल्प हॉस्पीटल, हॉटेल फ्लेवर्स आदींचे सहकार्य लाभले. १० किमीसाठी तारांगण ते गजानन महाराज मठ, नाचणे रोड, शांतीनगर व तिथून परत हा मार्ग होता. ५ किमीसाठी तारांगण ते शिवाजी स्टेडियमची मागील बाजू, गजानन महाराज मठ व तिथून परत तारांगणपर्यंत मार्ग ठेवला होता. या सर्व मार्गावर नाक्यानाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, सुवर्णसूर्य फाउंडेशन व विविध सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक पोलिस, पालक उपस्थित होते. चार ठिकाणी पाणी, गोळ्या अशा हायड्रेशनची व्यवस्था केली होती. सुरक्षेसाठी रुग्णवाहिका कार्यरत होती.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

